पुलवामा हल्ल्यासह विविध मुद्दे उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमक आघाडी उघडलेल्या तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही पार पडली. यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसह मंत्रिमंडळातील सहकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदत घेत बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. “तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं आनंदाने स्वागत केलं आहे. बऱ्याच दिवसांपासून भेटीच्या बातम्या येत होत्या. अखेर भेट झाली. या भेटीबद्दल आम्ही काहीही लपवून ठेवणार नाही. देशात जे काय वातावरण निर्माण झालं. वातावरण गढूळ झालं आहे. सुडाचं राजकारण सुरू आहे. हे आमचं हिंदुत्व नाहीये. या गोष्टी जर अशाच सुरूच राहिल्या तर देशाचं भवितव्य काय? मुख्यमंत्री कुणीही बनेल, पंतप्रधान कुणीतरी होईल, पण देशाचं काय? देशाचं काय होईल हा विचार कुणातरी करायला हवा. ती सुरूवात आजपासून आम्ही करत आहोत,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“संपूर्ण देशामध्ये राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. देश गेला खड्ड्यात म्हणून प्रत्येक जण आपला इरादा घेऊन चालला तर परवडणार नाही. त्यामुळे त्याला आकार यायला वेळ लागले. प्रयत्न सुरू केले आहेत मेहनत करावीच लागेल. मला खात्री आहे. देशाचे मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. मी काय केलं ते नाही, पण जे केलं नाही, तेही खोट्या पद्धतीने सांगितलं जात आहे. हे मोडलं पाहिजे. यासाठी एक दिशा ठरवली आहे. पुढे जशी प्रगती होईल. त्याची कल्पना दिली जाईल,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच खासदार संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. “तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. विकास, देशातील राजकारण, भविष्यात काय करायचं आणि कोणत्या दिशेनं वाटचाल करायची, याबद्दल दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. बऱ्यात मुद्द्यांवर केसीआर आणि उद्धव ठाकरे यांचं एकमत झालं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT