फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचं नाव आहे. 2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरूणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो या दोघांनी फसवणूक केली होती. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात शेरबानोला मुंबईहून अटक करण्यात आली आहे. किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत आहेत. महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्येही किरण गोसावीचा शोध घेतला जातो आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी पंच होता. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊ त्याच्यावर आरोप केल्यापासून तो फरार आहे.
ADVERTISEMENT
14 ऑक्टोबरला लुक आऊट नोटीस
2 ऑक्टोबर रोजी मुंबई NCB ने जेव्हा क्रूझवर छापेमारी केली होती तेव्हा त्यावेळी केपी गोसावी हा देखील त्या छापेमारीत सामील होता. केपी गोसावी हाच आर्यन खानला त्याच्या हाताला धरुन NCB कार्यालयात घेऊन आला होता. पण त्यानंतर त्याने आर्यन खानसोबत काढलेल्या एका सेल्फीमुळे तो अडचणीत आला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही व्हीडिओ जारी करुन केपी गोसावीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यानंतर एनसीबीकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की, ही व्यक्ती फक्त स्वतंत्र साक्षीदार होती.
दरम्यान, त्याचवेळी केपी गोसावी याने पुण्यातील काही तरुणांची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचं प्रकरणही समोर आलं. तेव्हापासून केपी गोसावी हा फरार झाला आहे. याच प्रकरणी आता पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली.
कोणत्या प्रकरणात केपी गोसावीविरोधात जारी करण्यात आली आहे लूकआऊट नोटीस?
किरण गोसावीविरुद्ध 2018 साली पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून पुणे पोलीस गोसावीच्या शोधात आहेत. पुणे आणि पुणे परिसरातील तरुणांकडून नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपये या ठिकाणी केपी गोसावी याने उकळले होते. पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या एका तरुणाकडून गोसावीने मलेशियात नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून 3 लाख रुपये उकळले होते.
चिन्मयने हे पैसे गोसावीला दिले, ज्यानंतर त्याला मलेशियात पाठवण्यातही आलं. परंतू मलेशियाला पोहचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चिन्मयला लक्षात आलं. चिन्मय यानंतर पुण्यात परत आला आणि त्याने किरण गोसावीकडे आपले पैसे परत मागितले, यावेळी गोसावीने चिन्मयला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चिन्मय देशमुखने पोलिसांत गोसावीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पुणे पोलीस गोसावीच्या शोधात होते, परंतू दरम्यानच्या काळात तो फरार झाला होता. आता या प्रकरणात किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT