कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात 127 कोटी भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, याआधी किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरामध्ये येताच अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते मुरगूडकडे रवाना झाले होते. ज्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात लेखी तक्रार दिलेली आहे.
‘सरकार अस्थिर करण्यासाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न’, गृहराज्यमंत्र्यांची टीका
किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
‘किरीट सोमय्या हे मागच्या वेळी जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा कलम 144 लावण्यात आला होता. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा होती. मला वाटते किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत आहेत.’
‘एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही फिरण्याची काय आवश्यकता आहे?, याचा अर्थ तुम्ही तिथे पब्लिसिटी स्टंट करत आहात आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात. सत्य थोडा उशिराने बाहेर पडतं, परंतु तोपर्यंत कारण नसताना लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे एक षडयंत्र रचलेलं आहे असं मला वाटतं.’
‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे की, हे सगळं आम्ही किरीट सोमय्या यांना करायला लावतोय. तर महाराष्ट्रालाही कळेल की सूड बुद्धीचं राजकारण होतंय.’ अशी प्रतिक्रीया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
सोमय्या यांचे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात नेमके आरोप काय?
-
मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने कोलकाता स्थित शेल कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या डझनभर कंपन्यांचं जाळं तयार केलं आहे. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
-
फेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्त्पन दाखवून त्या नावे उघडलेल्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार झाले असल्याचं दाखवलं असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
-
हसन मुश्रीफ, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांचे आर्थिक व्यवहार आणि पारदर्शकता नसलेल्या उत्पन्नाबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयकर प्राधिकरणाकडे सादर केली आहे.
-
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाला 100 कोटी रुपये कुठून मिळाले? याची चौकशी केली जावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आयकर, अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.
-
हसन मुश्रीफ यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संशयास्पद कंपन्यांसोबत विविध आर्थिक व्यवहार दाखवले आहेत. नाविद मुश्रीफ हा मेसर्स सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामधील प्रमुख भागधारक (शेअर होल्डर) आहे. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
Kirit Somaiya यांनी आरोप केलेले हसन मुश्रीफ आहेत शरद पवारांचे खंदे समर्थक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल!
-
सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड कोल्हापूरमध्ये आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग झालं असल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे.
-
नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी M/s CRM Systems Pvt Ltd कडून 2 कोटी आणि मेसर्स मारुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीकडून 3.85 कोटी कर्ज घेतले आहे. पण या दोन्ही कोलकात्यातील शेल कंपनी आहेत. असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.
-
या कंपन्यांचे संचालक सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर आणि गोपाल पोवार हे आहेत. जे हसन मुश्रीफ यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. असं आरोप सोमय्यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT