कोल्हापूर : कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा महोत्सव जगभरात पोहोचावा या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच कोल्हापूर ही आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनण्यासाठी कटिबद्ध असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.
केसरकर यांनी दसऱ्यानिमित्त कोल्हापूर तसेच राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यानिमित्त बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थानच्या संस्थापक ताराराणी, सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची परंपरा आणि करवीरनिवासिनी अंबाबाईच्या प्रती असलेली भक्ती यांचा संगम म्हणजे कोल्हापूरचा दसरा.
राजघराण्यामार्फत साजरा केला जाणारा हा सोहळा शासनामार्फत दरवर्षी दिमाखात साजरा केला जाणार आहे. कोल्हापूर संस्थानमार्फत छत्रपतींच्या परंपरा जपल्या जात आहेत. त्या यापुढेही जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे केसरकर यांनी सांगितले. यावर्षी या दसरा महोत्सवासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पुढील वर्षीपासून अतिशय भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाईल. सातारा येथे सुद्धा अशीच परंपरा आहे. ही परंपरा सुद्धा जगासमोर आणण्यासाठी छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत चर्चा करून नियोजन केले जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT