काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगरच्या कोपर्डी येथील, पीडित मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना मुंबई हायकोर्टाने आपलं शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दोन आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे उर्फ पप्पू आणि नितीन भैलुमे यांना दोषी मानून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT
सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात कैदेत असलेल्या दोन्ही आरोपींनी 2019 साली मुंबई उच्च न्यायालयात मुक्त विद्यापीठातून आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करत परवानगी मागितली होती. आज झालेल्या सुनावणीत जस्टीस पी.बी.वराळे आणि एस.एम.मोडक यांच्या खंडपीठाने येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दोन्ही आरोपींनी आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली.
परंतू 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रीया यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे ज्यावेळेला ही प्रक्रिया सुरु होईल त्यावेळी दोन्ही याचिकाकर्त्यांना याबद्दलची माहिती देण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. परंतू दोन्ही आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकील रेबेका गोन्झालवीस यांनी दोन्ही विद्यापीठातील प्रवेश प्रक्रीया सुरु झाल्याचं सांगितलं.
यानंतर दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने, “आमच्यासमोर जी काही परिस्थिती आली आहे त्यानुसार दोन्ही आरोपींनी आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही एक चांगली गोष्ट असून जेलमधील अधिकाऱ्यांनी यासाठी त्यांना सर्वतोपरीने मदत करावी”, असा आदेश देत याचिका निकाली काढली.
2016 साली कोपर्डी येथील पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. ज्यानंतर 2017 साली अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी मानत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानिकालाच्या विरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सुनावणी प्रलंबित आहे.
ADVERTISEMENT