गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी शनिवारी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. काही अफवाही पसरल्या होत्या. त्यानंतर लता मंगेशकर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लतादीदींतर्फेच एक आवाहन करण्यात आलं. यामध्ये लतादीदींनी सगळ्यांना कळकळीची विनंती केली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे लता मंगेशकर यांच्या अकाऊंटवरून करण्यात आलेलं ट्विट?
‘लतादीदी ब्रीचकँडी रूग्णालयातील ICU मध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर डॉ. प्रतीत समदानी आणि टीमकडून उपचार सुरू आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी प्रार्थना करू. सर्वांना कळकळीची विनंती आहे कुणीही खोट्या बातम्या, अफवा पसरवू नका. डॉ. प्रतीत समदानी यांच्याकडून लतादीदींचे हेल्थ अपडेट्स कळवले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’ अशी विनंतीही यामधून करण्यात आली आहे.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांना अद्यापही ICU मध्येच ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. त्याचप्रमाणे त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांना निमोनिया झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोरोनाचीही लक्षणं जाणवू लागली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे.
8 जानेवारीपासून लता मंगेशकर यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही त्यांची प्रकृती सुधारावी असं यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत असं डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांचे चाहतेही प्रार्थना करत आहेत. त्यांना लवकरच बरं वाटेल आणि त्या घरी परततील असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
2019 मध्ये 28 दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी
2019 मध्येही लतादीदींना निमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
ADVERTISEMENT