फोन टॅपिंग प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल असा ठराव एकमुखाने झाला होता. अधिवेशन मंगळवारी संपलं त्यानंतर तीन दिवसांमध्येच ही चौकशी समिती स्थापन झाली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे या समितीचे प्रमुख असतील. तसंच सीआयडी विभागाचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त स्पेशल ब्रांच हे या समितीचे सदस्य असणार आहेत.
ADVERTISEMENT
काय काय चौकशी केली जाणार आहे?
कोण कोणत्या राजकीय नेत्यांचे फोन फडणवीस सरकाच्या काळात टॅप केले गेले? 2015 ते 2019 या काळात चुकीच्या उद्देशाने कुणाकुणाचे फोन टॅप करण्यात आले. ते कॉल कुणाच्या सांगण्यावरून टॅप करण्यात आले?
ही उच्चस्तरीय समिती संपूर्ण चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण करून महाविकास आघाडी सरकारला सादर करणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि त्यामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबतची सगळी वस्तुस्थिती ही पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल. तसंच याबाबतच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण करण्यात येतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
2015 ते 2019 म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना फोन टॅपिंग करण्यात आलं होतं ते कुणाकुणाचं केलं गेलं? याचा तपास करणं हे या समितीचं मुख्य उद्दीष्ट असणार आहे असंही शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
नाना पटोले यांनी अधिवेशनात काय मागणी केली होती?
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2016-17 या वर्षात माझे फोन टॅप करण्यात आला होते. त्या काळात इतरही लोकांचे फोन टॅप झाले होते. मात्र एका खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर विधानसभेत नाना पटोले यांनी भाष्य केलं. ज्या अधिकाऱ्यांनी फोन टॅप केले त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर मान्यता घेतली होती का? याबाबतचा खुलासा केला पाहिजे. कुणाच्या इशाऱ्याने हे फोन टॅपिंग केलं जातं? मुस्लिम नाव लिहिलं जाऊन माझा फोन टॅप का केला गेला याचीही माहिती मिळाली पाहिजे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी असूनही, खासदार असून अंमली पदार्थांशी संबंधित आम्हाला भासवण्यात आलं हे सगळं का केलं गेलं याचा खुलासा झाला पाहिजे अशीही मागणी नाना पटोले यांनी केली होती.
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगनंतर सुबोध जयस्वाल एक पत्र लिहिलं होतं.. काय आहे त्या पत्रात?
पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर मी हे संपूर्ण प्रकरण तपासलं. त्यासाठी काही फोनही टॅप केले. जाणीवपूर्वक काही फोन नंबर हे सर्व्हिलन्सवर होते. ज्यासाठीची मी रितसर परवानगी घेतली होती. या फोन टॅपिंग आणि इतर गोळा केलेल्या माहितीनंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यासंदर्भातली माहिती आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आहे. जे आरोप झाले ते धक्कादायक आहेत आणि समोर आलेलं वास्तवही जळजळीत सत्य आहे.
पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट आणि त्यासाठी काम करणारे काही दलाल कार्यरत आहेत. या सगळ्यांचा जवळचा संबंध काही राजकारण्यांशी आहे. हे देखील समोर आलं आहे. बदल्यांसाठी काम करणाऱ्या ब्रोकर्सचं रॅकेट आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते मोठ्या पदांपर्यंतच्या बदल्यांचा समावेश आहे.
रश्मी शुक्ला यांचं हे पत्र बाहेर आल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.
ADVERTISEMENT