राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
ADVERTISEMENT
राज्यात मान्सूनचं आगमन होण्यास अवकाश असला, तरी वातावरणीय बदलांमुळे राज्यातील काही भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांतील हवामानाचा अंदाज व्यक्त केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
६ जूनसाठीचा अंदाज
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ६ जून रोजी राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
७ जून रोजी कसं असेल हवामान?
७ जून रोजी पावसाची व्याप्ती वाढणार असल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान सर्वसामान्य असणार आहे.
८ जूनसाठीचा अंदाज
राज्यात ८ जून रोजी पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भात उष्णतेची लाट…
हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केलेली असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट जाणवणार आहे.
६ जून रोजी विर्दभातील वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवू शकते. त्याचबरोबर ७ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला असेल, असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT