ऋत्विक भालेकर, व्यंकटेश दुड्डुमवार – मुंबई तक प्रतिनिधी
ADVERTISEMENT
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघाती आरोप केला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. नानांचा पक्षांतराचा इतिहास उगळून अजितदादांनी जणू त्यांच्या जखमेवर मीठच चोळण्याचं काम केलं. त्यावर भल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत नानांनीही दादांवर प्रतिहल्ला चढवला आहे.
या सगळ्यात भोंगे, हनुमान चालीसा, अयोध्या आणि भगव्याच्या राजकारणात थोडी अडगळीत पडलेली काँग्रेस पुन्हा एकदा आपली न्यूज व्हॅल्यू दाखवत चर्चेत आली आहे.
पण नेमकं असं काय घडलं की नानांचा पारा इतका चढलाय? तर निमित्त आहे भंडारा-गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकांचं. नानांचा आरोप आहे की, महविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये लिखित करार असून देखील राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली.
नगर पंचायत आणि पंचायत समितीत काँग्रेसची पंचाईत केली तर गोंदियात काँग्रेसला एकटं पाडलं. तिथं काँग्रेसच्या उषा मेंढे यांचा पराभव करून अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगदले तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर यांची निवड झाली. गोंदिया जिल्हापरिषदेत 26 भाजप, 13 काँग्रेस, 6 राष्ट्रवादी, 4 जनता पार्टी आणि 2 अपक्ष असं पक्षीय बलाबल आहे.
खरंतर राज्यात आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम सोबतच होते पण भंडारा-गोंदियात पटेल विरुद्ध पटोले संघर्ष तसा जुना आहे. या जिल्ह्याच्या इतिहासावर एक नजर टाकली तर लक्षात येईल की राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात पारंपरिक वैर आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने परस्पर प्रफुल्ल पटेल यांना तिकीट घोषित केलं होतं. त्यामुळे या जागेसाठी इच्छुक असलेल्या नाना पटोले यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपच्या तिकिटावर पटेलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा तब्बल दीड लाखांच्या फरकाने पराभव केला होता.
मात्र, काही वर्षातच पटोले यांचे स्थानिक भाजप नेत्यांशी खटके उडू लागले आणि त्यांनी थेट मोदींवर तोफ डागत पुन्हा राहुल गांधींच्या साक्षीने काँग्रेसची कास धरली. यावेळेला मात्र पटोले यांना विधानसभा अध्यक्ष आणि त्यानंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची लॉटरी लागली. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी एविएशन घोटाळ्यांच्या आरोपानंतर भाजपशी जवळीक साधत राज्यसभेचा मार्ग निवडला.
आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पटेल-पटोले वाद उफाळून वर आला आहे. पटोलेंच्या खरमरीत टीकेनंतर अजितदादांना ही राहवलं नाही. दादांनी त्यांच्या शैलीत ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवण्याचा पटोलेंना सल्ला दिला. पण पटोले आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीएत. त्यांनी महाविकास आघाडीचा करारनामा जाहीर करून टाकला. ज्याच्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शिवसेनेच्या सुभाष देसाई यांची स्वाक्षरी आहे.
‘BJP सोबत सत्ता स्थापन करणं म्हणजे पाठीत खंजीर खुपसणं’, नाना पटोलेंची NCP वर टीका
आता काँग्रेसला परिणामांची चिंता नसल्याचा इशारा देखील पटोले यांनी दिला आहे. तसेच जयपूरमधल्या काँग्रेसच्या शिबिरात हायकमांडला दगा फटक्याबाबत अवगत करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात आगामी निवडणुकांमध्ये आघाडीतील बिघाडी शमते की आणखी उफाळून वर येते यावर महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असेल.
ADVERTISEMENT