हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. वयाच्या चाळीशीत असलेल्या सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. बिग बॉस आणि बालिका वधू यासारख्या गाजलेल्या शो मधून सर्वसामान्यांच्या घरात पोहचलेला सिद्धार्थ शुक्ला अनेकांचा आवडीचा अभिनेता होता. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्याच्या निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
सिद्धार्थ मुंबईतल्या ज्या भागात लहानाचा मोठा झाला तिकडचा त्याचा लहानपणीचा मित्र आणि सध्या मनसे पक्षाचं नेतृत्व करणारे किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबूकवर सिद्धार्थच्या लहानपणीच्या आठवणी जागवल्या आहेत. किर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये सिद्धार्थच्या लहानपणीच्या स्वभावाचे अनेक कांगोरे उलगडून दाखवले आहेत.
सिद्धार्थ शुक्ला हा माझा बालपणीचा मित्र. त्याचं नाव सिद्धार्थ आहे, हे मला तो ‘फेमस’ झाल्यावर कळलं. आमच्यासाठी तो ‘मॉन्टी’ (मोन्टू) होता. मुंबई सेंट्रलला ज्या कॉलनीत मी लहानाचा मोठा झालो, तिथेच मॉन्टी राहायचा. बाजूच्या बिल्डिंगमध्ये. शाळेच्या दिवसांतच मॉन्टी सहा फुटांपेक्षा उंच झाला. ‘देखणा’ काडी पैलवान. एकदम शिडशिडीत. पण एक नंबरचा भांडकुदळ. प्रत्येकाशी भांडण उकरून काढणं, ‘उंगल्या’ करणं हा त्याचा एकमेव छंद. स्वभावच म्हणा ना. मॉन्टी माझ्यापेक्षा एक-दोन वर्षाने लहान. आम्ही पिकनिकला गेलो तरी कुणाचीतरी खोड काढल्याशिवाय त्याला स्वस्थ वाटायचं नाही. पण पुढे मॉडेलिंग आणि नंतर अभिनयाच्या क्षेत्रात गेल्यावर तो शांत झाला. एकदम परिपक्व व्यक्तिमत्व. उंची होतीच, पण व्यायामाने त्याने शरीर कमावलं. त्याला जाहिराती मिळू लागल्या. ‘बिग बॉस’ विजेता ठरला, तेव्हा तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. ‘बॉम्बे टाइम्स’ पुरवणीत तो ‘हॉट’ असल्याच्या बातम्या-लेख रोज येऊ लागले. एक मित्र म्हणून मला गंमत वाटायची… ‘सिद्धार्थ शुक्लाचे निधन’ अशा बातम्या धडकल्या आणि बालपणीच्या या आठवणी जाग्या झाल्या. खोडकर मित्रा मॉन्टी, तुझ्या चाहत्यांना हा धक्का पचणारा नाही. मॉन्टीला श्रद्धांजली.
किर्तीकुमार शिंदे यांची फेसबूक पोस्ट, जशीच्या तशी
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सिद्धार्थ काही औषधं घेऊन झोपला मात्र सकाळी तो उठलाच नाही. त्यामुळे सिद्धार्थला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कूपर रूग्णालयात सिद्धार्थला नेण्यात आलं होतं. मात्र रूग्णालयाने त्याला मृत घोषित केलं.
Siddarth Shukla च्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाझ गिलने अर्ध्यावर सोडलं शुटींग
मॉडेलिंगच्या क्षेत्रातून सिद्धार्थने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर बाबुल का आंगन छुँटे ना या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याव्यतिरीक्त सिद्धार्थचे जाने पेहचाने से, ये अजनबी, लव्ह यू जिंदगी, बालिका वधू हे शो देखील खूप गाजले. बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचं सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपद पटकावलं होतं. सिद्धार्थ आपल्या फिटनेसबाबत नेहमीच सजग असायचा…त्यामुळे अशा अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Siddarth Shukla ची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट ठरतेय चर्चेत, ‘या’ व्यक्तींचे मानले होते विशेष आभार
ADVERTISEMENT