शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे जो उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी संपलेला पक्ष असा केला होता. त्यानंतर आता त्याच अनुषंगाने मनसेच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
ADVERTISEMENT
अमेय खोपकर यांनी काय म्हटलं आहे?
चिन्हं बदलतात… कुणाची गोठतात. आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावतं आहे असं ट्विट मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काय ट्विट केलं आहे?
संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं चिन्हही कालाय तस्मै नमः असं म्हणत मनसेच्या संदीप देशापांडे यांनी ट्विट करत या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गजानन काळे यांनी काय म्हटलं आहे?
धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही …आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीचं “घड्याळ”नाहीतर अबू आझमी च्या “सायकल”चाच आधार आहे … संपलेल्या पक्षा बद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा …
निवडणूक आयोगाच्या दारात शिंदे विरूद्ध ठाकरे हा वाद गेला होता. शिवसेनेचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दोन्ही गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून म्हणजेच ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे?
“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही डाव तुमच्या हातात असला तरी जिंकता तुम्हाला येत नाही” मोदी-शहा जी फडणवीसजीतुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय म्हटलं आहे?
आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह! सोबत आहे फक्त ‘ठाकरे’ नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म.. कायदेशीर लढाया सुरूच राहतील.. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील..
ADVERTISEMENT