रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड
ADVERTISEMENT
बीड जिल्हा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अशात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकावर झालेल्या आरोपांची चर्चा आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने बेकायदेशीर धाड टाकून 4 लाख 55 हजार रूपये हडप केल्याची तक्रार गृहमंत्र्यांपर्यंत पोहचल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाशी, यातील आरोपांशी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचा काहीही संबंध नाही. मात्र त्यांना जेव्हा यासंबंधीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच माझ्या पथकातील लोक असतील तरीही चुकीला माफी नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या साकुड रोडवरच्या एका शेतात 25 जानेवारीच्या रात्री अंबाजोगाईच्या पोलीस पथकाने धाड टाकली. त्यानंतर रमी खेळणाऱ्या 11 जणांना ताब्यात घेतलं. या 11 जणांमध्ये काही बड्या हस्तींचा सहभाग होता. घटनास्थळी पोलिसांना काही महागड्या कारही सापडल्या. यानंतर पोलीस पथकाने संगनमत करून आमच्या कारमध्ये असलेली आणि खिशात असलेली जास्तीची रक्कम जप्त करून त्यापैकी पंचनाम्यावर काही रक्कम दाखवली. उर्वरित रकमेचा गैरवापर केला असा आरोप तक्रारदारांनी आयुक्तांना केलेल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी श्रीमंत मोरे, श्रीकृष्ण सोनी, प्रकाश चव्हाण हे तिघे मुख्य तक्रारदार आहेत. त्यांनी पोलीस पथकावर हा आरोप केला आहे. मात्र सदर प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा त्या पथकात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर या त्या ठिकाणी नव्हत्या. तसंच जी तक्रार देण्यात आली त्यामध्ये कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेखही नाही. असं असलं तरीही आपल्या पथकावर आरोप झाले आहेत हे समजताच त्यांनी तातडीने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे तक्रार?
तक्रारदार जनार्दन कोंडीबा उमाटे , विश्वनाथ रानबा दौंड, बाळकृष्ण विठ्ठल लांडे, नानासाहेब कदम , ज्ञानोबा विठ्ठलराव तांदळे, गजानन माणिकराव आरोळे, संभाजी भानुदास शिंदे, संतोष तात्या केकाण अशी तक्रारदारांची नावं आहेत. या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी धाड टाकण्यासाठी आल्याचं भासवून कोणताही पंचनामा न करता 4 लाख 55 हजार रूपये आपल्या खिशात घातले. यासंदर्भातली सविस्तर तक्रारही त्यांनी लिहिली आहे. तसंच या घटनेचं शुटिंग केल्याचंही या तक्रार अर्जात नमूद करण्यात आलं आहे. या संदर्भातली तक्रार या तक्रारदारांनी पोलीस आयुक्तांकडे दिली आहे. तसंच गृहमंत्रालयालाही याची प्रत पाठवली आहे.
कविता नेरकर या अत्यंत प्रामाणिक आणि धडाडीच्या पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. बीड जिल्ह्यात बदली झाल्यापासून त्यांनी इथल्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच त्यांना जेव्हा या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांपैकी कुणी दोषी आढळलं तर योग्य ती कारवाई केली जाणारच असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT