उत्तर सोलापूर तालुक्यात पाथरी येथे द्राक्षबागेतील शेततळ्यात पडून आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. सारिका ढेकळे (वय २२), गौरी ढेकले (वय ४) आणि आरोही ढेकले (वय २) अशी या अपघातातील मृत मायलेकींची नावं आहेत. दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान शेतात पाखरं हाकलण्यासाठी गेले असता हा अपघात घडल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सारिका ढेकळे यांचे पती अक्षय यांचं शेतातचं घर असल्याचं समोर येतंय. द्राक्षबागेची काळजी घेता यावी म्हणून ढेकळे परिवार इथेच राहतो. पोलीस सध्या या प्रकरणात ढेकळे मायलेकींचा पाय घसरुन मृत्यू झाला की आत्महत्या या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू होण्याची ही जानेवारीतील दुसरी घटना आहे. याआधी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे अशाच पद्धतीने तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.
मायलेकींचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. तिघांचेही मृतदेह शेततळ्यातून काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली आहे. मृत्यूमागचं खरं कारण हे तपासाअंती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT