जका खान, प्रतिनिधी, वाशिम
माझ्याबद्दल जे उद्गार उद्धव ठाकरेंनी काढले त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. काल मी उद्धव ठाकरे साहेबांची ताई होती, आज बाई म्हणून त्यांनी माझा उल्लेख केला. याचं मला खूप दुःख झालं. त्यांच्या या बोलण्यामुळे वेदना झाल्या आहेत असं म्हणत खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
बुधवारी झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून अनेकांचा समाचार
बुधवारी मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भावना गवळींवर टीका केली. ते असं म्हणाले की, “मला पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं. स्वतःच्या पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं, तुम्हाला सव्वा काय दीड कोटी जनतेतून हीच बहिण मिळाली राखी बांधायला?” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भावना गवळींवर टीका केली होती. त्याला आज भावना गवळी यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या आहेत भावना गवळी?
“मागच्या २५ वर्षांपासून माझ्या मतदारसंघातील बांधवांना दरवर्षी मी एक लाख राख्या पाठवत असते. हा उपक्रम नवीन नाही. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून मी राखी बांधते. मी अहमदाबादमध्येही त्यांची भेट घेतली होती. मी सातत्याने त्यांना राखी बांधत आले आहे. माझा जो काही उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला त्याचं मला खूप वाईट वाटलं माझ्या मनाला खूप वेदना झाल्या.”
“उद्धव ठाकरे यांनी एका पवित्र बंधनाबाबत जे वक्तव्य केलं, मी कालपर्यंत साहेबांची (उद्धव ठाकरे) ताई होती आज बाई म्हणून त्यांनी माझा उल्लेख केला. राजकारण करायला अनेक जागा आपल्याला असतात. मात्र ज्या पद्धतीने बोललं गेलं त्यामुळे मी दुखावले आहे. माझ्या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केलं. तसंच जे रक्षाबंधनचं पवित्र नातं आहे त्या बंधाचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे. मी नवीन असं काहीही केलं नाही.” असं म्हणत भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
वेदांतबद्दल धादांत खोटं बोललं जातं आहे
वेदांत प्रकल्प गेला, त्यानंतर त्याबद्दल धादांत खोटं बोललं जातं आहे. आरोप प्रत्यारोप केलं. मिंधे गट नुसता तमाशा बघतो आहे. महाराष्ट्राची बाजू घेऊन का सांगत नाहीत? आज दिल्लीत गेले आहेत दिल्लीत गोंधळ आणि गल्लीत मुजरा. कुणामुळे गेला?ते सोडून द्या तुम्ही आणून दाखवा राज्यात प्रकल्प मी तुम्हाला साथ देतो विरोधक तुम्हाला त्यासाठी साथ देतील असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
ADVERTISEMENT