अमरावती लोकसभा मतदार संघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्रातील मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणाचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. विरोधी पक्षातील खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचीही मागणी केली. नवनीत राणा यांनीही लोकसभेत या विषयावर आपलं मत आक्रमकपणे मांडलं. परंतू यानंतर लोकसभेतील लॉबीमध्ये अरविंद सावंत यांनी मला धमकी दिल्याचं पत्र राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहीलं आहे.
ADVERTISEMENT
तू महाराष्ट्र मे कैसे घुमती है, मै देखता हू और तेरे को भी जेल मे डालेंगे असं म्हणत सावंत यांनी आपल्याला धमकी दिल्याचं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटलं आहे.
याआधीही आपल्याला शिवसेनेच्या लेटरहेडवर आणि फोनवर माझ्या चेहऱ्यावर Acid टाकून मला मारण्याची धमकी मिळाली होती. यानंतर आज शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी आपल्याला धमकी दिली आहे. हा माझाच नाही तर देशातील सर्व महिलांचा अपमान असल्याचं म्हणत राणा यांनी अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राणा यांनी आपल्या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनाही पाठवलं आहे.
दरम्यान अरविंद सावंत यांनी नवनीत राणा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मला त्यांना धमकावण्याची काय गरज आहे? त्यावेळेला तिकडे जी लोकं उपस्थित होती त्यांना विचारा ती लोकं सांगितलं. नवनीत राणा यांची बोलण्याची शैली व पद्धत ही अत्यंत घृणास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात त्या वाट्टेल तसं बोलतात असं म्हणत सावंत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
ADVERTISEMENT