योगेश पांडे, नागपूर: नागपूरच्या कोराडी परिसरातून दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर असं मृतक चिमुकल्याचे नाव आहे. बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे. याबाबतची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ADVERTISEMENT
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपासणी सुरु केली आहे.
दोन दिवसापूर्वी बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर हा चार वर्षीय चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. बॉबी कुठेही दिसत नसल्याचे त्याच्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण कोराडी परिसर पिंजून काढला आहे, मात्र बॉबीचा कुठेही शोध लागला नाही.
त्यामुळे बॉबी हरवल्याची तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून बॉबीचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना सुद्धा बॉबीचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर काल (3 जानेवारी) बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे.
अपघात की घातपात, तपास सुरू:
1 जानेवारी रोजी बॉबी त्याच्याच घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 3 जानेवारीला त्याचा मृतदेह कॅनलमध्ये मिळून आला आहे.
संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. बॉबीचे अपहरण केल्यानंतर कुणी त्याची हत्या केली का? या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे.
Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं
बॉबीच्या अपहरणानंतर त्याच्या सुटकेसाठी कोणत्याही प्रकारच्या खंडणीसाठी वैगरे त्याच्या कुटुंबीयांना फोन आला नव्हता. त्यामुळे बॉबीची मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाची नेमकी दिशा ठरणार आहे.
प्राथमिक अंदाजानुसार बॉबीची हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता बॉबीच्या पालकांना नेमका कुणावर संशय आहे याची देखील पोलीस चौकशी करणार आहेत. या सगळ्या प्रकारामुळे कोराडी परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आता नागपूर पोलिसांना लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावावा लागणार आहे.
ADVERTISEMENT