नागपूर: RSS मुख्यालय रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट, धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई तक

• 07:06 AM • 09 Jan 2022

योगेश पांडे, नागपूर: नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवसापूर्वीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती की, काही महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचाच्या हस्तकाने नागपुरातील संघ मुख्यालय आणि डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन यासह अन्य संवेदनशील स्थळांची रेकी केली होती. आता याबाबत नागपूर पोलिसांना तपासात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. मात्र, याच तपासादरम्यान नागपूर पोलिसांना मोठं यशही […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर: नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवसापूर्वीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती की, काही महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचाच्या हस्तकाने नागपुरातील संघ मुख्यालय आणि डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन यासह अन्य संवेदनशील स्थळांची रेकी केली होती. आता याबाबत नागपूर पोलिसांना तपासात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. मात्र, याच तपासादरम्यान नागपूर पोलिसांना मोठं यशही मिळालं आहे.

हे वाचलं का?

नागपुरातील संघ मुख्यालय आणि डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन याच्या रेकीमागे आत्मघाती हल्ल्याचा कट असल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे. ज्या व्यक्तीने नागपुरात रेकी केली होती तो व्यक्ती जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हस्तक असून त्याचे नाव रहीस अहमद शेख (वय 26 वर्ष) असल्याचे समोर आले आहे.

याच व्यक्तीने काश्मिरातून नागपुरात येऊन तब्बल तीन दिवस मुक्काम केला होता. ही संपूर्ण माहिती आता पोलिसांकडून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रईसला जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर असलेल्या उमर याने नागपुरात पाठवले होते. श्रीनगरवरून मुंबई आणि मुंबईवरून नागपूर असा विमानप्रवास करुन रईस हा जुलै महिन्यात रेकी करण्यासाठी आल्याचं यावेळी तपास यंत्रणेसमोर आलं आहे. नागपूर पोलिसांचे एक पथक डिसेंबर महिन्यात श्रीनगर येथे जाऊन आले असून ते आता रईसला चौकशीसाठी नागपूरला घेऊन येणार असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे.

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी श्रीनगर येथे केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती रईस लागला आणि त्यानेच नागपुरात रेकी केली असल्याची माहिती यंत्रणेला दिली होती. हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील असल्यामुळे नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा, एटीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपुरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी संघटना शहरात घातपाती कारवाया करण्याचा कट आखत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली होती.

यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे नाव पुढे आलं होतं. त्यांनी माहिती देताना सांगितलेलं की, ‘मागील काही दिवसांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली की, जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी नागपुरात काही ठिकाणी रेकी केली आहे. अशा प्रकारे रेकी केल्याप्रकरणी प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागपूर गुन्हे शाखा करत आहे.’

RSS च्या इमारतीची जैश-ए-मोहम्मदकडून रेकी ही अतिशय गंभीर बाब: फडणवीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी नागपुरातील अनेक प्रसिद्ध परिसरांचे फोटो आणि व्हीडिओ तयार केले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सध्या कसून तपासणी केली जात आहे.

घातपाती कारवायाच्या अलर्टनंतर नागपूरमधील सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले होते. आता सध्या पोलीस सर्व प्रमुख ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.

    follow whatsapp