नंदूरबार : ठाकरे गटाच्या मदतीने भाजपकडून शिंदे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’, काँग्रेसचा ‘गेम’

मुंबई तक

• 03:13 AM • 19 Oct 2022

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक निकाल : राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत कमी आमदार असतानाही भाजपनं शेवटची सहावी आणि दहावी जागा जिंकली. फडणवीसांनी बारीक रणनीती राबवत मविआला धूळ चारली. आणि याच निवडणुकीनंतर ठाकरेंचं सरकार कोसळलं. हा चमत्कार शिंदेंच्या साथीनं झाला. अशीच कमाल भाजपच्या आणखी एका नेत्यानं नंदूरबारमध्ये केलीये. नंदूरबारमध्ये ठाकरेंच्या मदतीनं शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम झालाय. मात्र […]

Mumbaitak
follow google news

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक निकाल : राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत कमी आमदार असतानाही भाजपनं शेवटची सहावी आणि दहावी जागा जिंकली. फडणवीसांनी बारीक रणनीती राबवत मविआला धूळ चारली. आणि याच निवडणुकीनंतर ठाकरेंचं सरकार कोसळलं. हा चमत्कार शिंदेंच्या साथीनं झाला. अशीच कमाल भाजपच्या आणखी एका नेत्यानं नंदूरबारमध्ये केलीये.

हे वाचलं का?

नंदूरबारमध्ये ठाकरेंच्या मदतीनं शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम झालाय. मात्र तसा गेम काँग्रेसचा झालाय. नंदूरबारमध्ये नेमकं काय झालं की ज्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये विळ्याभोपळ्याचं वैर निर्माण झालंय आणि कमी संख्याबळ असताना भाजपनं सत्ता कशी मिळवली? तेच समजून घ्या…

नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे उर्वरित अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी सोमवारी १७ ऑक्टोबरला मतदान झालं. ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक २४, भाजपकडे २०, शिवसेनेचे आठ तर, राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. याच संख्याबळानुसार गेली अडीच वर्ष काँग्रेस आणि शिवसेनेकडे सत्ता होती. पण राज्यातलं सत्तांतर आणि जिल्ह्यातलं नवं सत्तासमीकरण यावेळी काय घडतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक : विजयकुमार गावितांची खेळी

नंदूरबारच्या राजकारणातलं बडं प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे डॉ. विजयकुमार गावित हे पालकमंत्री झालेत. गावितांची एक मुलगी डॉ. हिना गावित खासदार आहे, तर दुसरी मुलगी सुप्रिया गावित जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यामुळे गावितांनी आपल्या मंत्रिपदाचा लाभ घेत जिल्हा सत्तांतरासाठी चक्रं फिरवायला सुरवात केली. आणि आपल्या मुलीलाच भाजपकडून अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. तर काँग्रेस बंडखोर सुहास नाईकांना उपाध्यक्षपदाचा उमेदवार केलं होतं.

दुसरीकडे राज्यात शिवसेनेत फाटाफूट झाली, तरी नंदूरबारमध्ये शिंदे गटानं महाविकास आघाडीचंच सत्तासूत्र कायम ठेवलं. अध्यक्षपद काँग्रेसला आणि उपाध्यक्षपद शिंदे गटाला. काँग्रेसनं सीमा वळवी यांना अध्यक्षपदाचं तिकीट दिलं होतं, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे राम रघुवंशी रिंगणात उतरवलं होतं. रघुवंशी हे शिंदे गटातले नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या गोटातले उमेदवार होते.

शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचे २४ सदस्य एकत्र आले, की विजयाचं गणित सहज पार होणार होतं, पण काँग्रेस-शिवसेना यांच्या सदस्यांची फूट तसंच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं भाजपनं सहज विजय मिळवला. सुप्रिया गावित अध्यक्ष, तर काँग्रेस बंडखोर सुहास नाईक उपाध्यक्ष झाले. दोघांनाही प्रत्येकी ३१ मतं मिळाली, तर विरोधकांना २५ मतांवर समाधान मानावं लागलं.

nandurbar zilla parishad nivadnuk : ठाकरे गटाच्या आमश्या पाडवीच्या नेतृत्वात शिंदे गटाविरुद्ध खेळी

भाजपला मिळालेल्या ३१ मतांमध्ये शिवसेनेची म्हणजेच ठाकरे गटाची दोन, राष्ट्रवादीची चार आणि काँग्रेसच्या पाच मतांचा समावेश आहे. आमदार आमश्या पाडवी हे जिल्ह्यातला ठाकरे गटाचा चेहरा आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वात शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

आता प्रश्न येतो, शिंदे गट आणि भाजप एकत्र का आले नाहीत? तर त्याचं गुपित दडलंय विजयकुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यातल्या कुरघोडीच्या राजकारणात. जिल्ह्याच्या राजकारणात दोघांमधून विस्तवही जात नाही. पण ठाकरे-शिंदेंच्या जिरवाजिरवीत खरा गेम झालाय काँग्रेसचा. कारण नैसर्गिक मित्र राष्ट्रवादी सोबत आली, तरी काँग्रेसचं विजयाचं गणित सहज पार झालं असतं. मात्र नंदूरबारच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये भाजपची जशी अवस्था झाली होती, तशी काँग्रेसची झालीये.

दुसरीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जिल्ह्यातली सर्व सत्ताकेंद्र गावित कुटुंबाच्या हाती एकवटली आहेत. घराणेशाहीमुक्त राजकारणाचा नारा देणाऱ्या भाजपमध्ये नंदूरबारमध्ये एक आगळावेगळा पॅटर्न आकाराला येताना दिसतोय.

    follow whatsapp