परिस्थिती कधी कुणाला काय करायला लावेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना घडली आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये नंबरप्लेट नसलेल्या प्लेजर मोपेडवरून गंगापूर रोडवरील भाजी बाजार परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असता, तो अट्टल चेनस्नॅचर निघाला. पण, आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे चेनस्नॅचिंग करणारा हा व्यक्ती शिकाऊ ग्रामसेवक आहे.
ADVERTISEMENT
शिकाऊ ग्रामसेवक पदावर असलेल्या या आरोपीविरुद्ध चेनस्नॅचिंगचे पाच गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 लगडी जप्त केल्या आहेत.
आरोपी कसा अडकला जाळ्यात?
ग्रामसेवक म्हणून नोकरीला असलेला आरोपी अनेक महिन्यांपासून चेनस्नॅचिंग करत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली. 15 डिसेंबर रोजी पोलीस मित्र असलेल्या नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोळसे व अंमलदार जाधव यांना एक व्यक्ती संशयास्पद रीतीने गंगापूर-आकाशवाणी टॉवर परिसरात विनानंबर प्लेटच्या मोपेडवरून फिरत आहे, अशी माहिती दिली.
पोलीस मित्रांनी माहिती दिल्यानं पोलिसांनी लगेच त्याची दखल घेतली. त्यानुसार ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांना देण्यात आली. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव विपुल रमेश पाटील असल्याचं समोर आलं.
आरोपी विपुल पाटील हा चांदवङमध्ये शिकाऊ ग्रामसेवक म्हणून नोकरी करतो. त्याने कोरोना काळात 14 लाख रुपयांचं कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी तो सुट्टीच्या दिवशी सोनसाखळी चोरण्याचा उद्योग करायचा. आरोपीनेच कर्ज फेडण्यासाठी चेनस्नॅचिंग करत असल्याची कबुली दिली.
गंगापूर पोलीस ठाण्यात त्याची अधिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत भा. दं. वि. कलम 392 प्रमाणे त्याच्याविरुद्धचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून 11 तोळे वजनाच्या 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 लगडी व 20 हजार रुपये किमतीची प्लेजर मोपेड असा 5 लाख 14 हजार 859 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT