कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. यानंतर राज्यात निर्माण झालेली पूरपस्थिती आता हळुहळु नियंत्रणात येते आहे. खेड, चिपळूण, महाड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा अनेक भागांत पुराच्या पाण्यामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय. या पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे सरसावला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदार आपलं एक महिन्याचं वेतन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचं उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं. ते सांगलीत पूरसदृष्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भारात रोगराईची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. औषधाचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सांगली इथं पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देत आहोत. राज्यभरातून धान्य, मदत मिळत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे. पण जनतेनंही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलंय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार असल्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना अजित पवारांनी पुराचा फटका बसलेल्या सर्व जिल्ह्यांची माहिती मी घेतलेली असून मदतीसंबंधी दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली. राज्यात दरवर्षी अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्यात एसडीआरएफची एक टीम कराडला ठेवता येईल का याचा विचार सुरु आहे. रायगडला एक टीम ठेवली जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. NDRFच्या धर्तीवर राज्यात SDRF तैनात राहणार, असं अजित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT