महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता राज्य सरकार व स्थानिक जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध कडक केले आहेत. सातारा जिल्ह्यातही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून नवीन म्युटेशनचा कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिल्हातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ ही फक्त सातारा शहरापूरती मर्यादीत राहिलेली नसून ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत भर पडत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात माण, खटाव आणि कोरेगाव हे तालुके हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. साताऱ्याच्या ग्रामीण भागातील चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एका रुग्णामध्ये कोरोनाची नवीन प्रजाती आढळल्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. या रुग्णावर सध्या उपचार सुरु असून लोकांनी खबरदारी घेत नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याची प्रतिक्रीया साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधताना येत्या ८ ते १० दिवसांनंतर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर दिसून येत आहे.
ADVERTISEMENT