भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणात ही अटक होऊ शकते. या प्रकरणी आता नितेश राणे यांनी जामिनाठी अर्ज केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.
ADVERTISEMENT
सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणेंना अटक करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांना नितेश राणेंना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र नितेश राणे हे एकदाही चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते आहे. नितेश राणे यांच्या घरीही पोलीस गेले होते मात्र तेव्हा नितेश राणे तिथे नव्हते.
नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. याबाबत कोर्ट नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जिल्हा बँक निवडणुकीमुळे सिंधुदुर्गातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणात आता आमदार नितेश राणे यांना अटक केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही अशी शंका व्यक्त केली असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंना अटक होण्याबद्दलच्या वृत्तावर भाष्य केलं. राणे म्हणाले, ‘कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? सत्तारुढ लोकांचा जिल्हा बँकेत पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हे सुरू आहे. केस दाखल केलीये की नाही, मला माहिती नाही. काल मी जिल्ह्यात होतो, पण तोपर्यंत काही झालेलं नव्हतं. हे सुडाच्या राजकारणातून चाललं आहे’, असं राणे म्हणाले.
नितेश राणे अज्ञातवासात गेल्याच्या वृत्तावर बोलताना राणे म्हणाले, ‘अज्ञातवासात नाहीये. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही. ते आमदार आहेत. त्यामुळे अज्ञातवासात वगैरे काही नाही. अटक करण्याच्या बातम्या दिल्या जात असतील, तर आम्ही न्यायालयात तर जाणारच’, असं राणे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT