भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हसन मुश्रीफ, भावना गवळी, अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. आता आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्र लिहून राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा वाचा फोडा अशी मागणी केली आहे. तसंच यासंबंधी लवकरच पुरावे देणार असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नितेश राणे यांचं पत्र?
आपणाकडून तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या बाहेर काढली जात असून भविष्यात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या दृष्टीने आपण उघडलेल्या मोहीमेमुळे महाराष्ट्रीय जनतेला निश्चितच अभिमान वाटत आहे . सद्या कोकणात विशेषतः रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनील परब व उदय सामंत यांनी सत्तेच्या माध्यमातून गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे . त्यापैकी अनिल परब यांची चौकशी आपल्या तक्रारीवरून सुरू आहे . त्याचप्रमाणे उदय सामंत व त्यांचे पडद्या मागून भ्रष्ट कारभार सांभाळणारे बंधू किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांमधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा सपाटा लावला आहे.
किरण सामंत यांची मे . आर . डी . सामंत कन्सट्रक्शन कंपनी असून तीच्या मार्फत दोन्ही जिल्ह्यामधील करोडो रूपयांच्या कामांचे ठेके पदरात पाडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत . त्यामध्ये बोगस कंत्राटदार उभे करून त्यांच्यामार्फत कामे केली जात आहेत . त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय विभागामार्फत पर्ससीन , नेटधारक व एल . ई . डी . धारक यांचेकडून करोडो रूपयांची वसुली दरमहा करण्यात येत असल्याबाबत नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे तक्रार केली आहे.
त्याचप्रमाणे व्हाईस चॅन्सलर नियुक्त्यांमध्येही गैरमार्ग अवलंबल्याचे पुरावे आपणाकडे लवकरच सादर करीत आहोत . अशाप्रकारे मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . तरी भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे . याबाबतचे सर्व पुरावे लवकरच आपणास सादर करण्यात येतील. असे पत्र नितेश राणे यांनी किरीट सोमय्या यांना लिहिले आहे. त्यामुळे आता पुढचा नंबर उदय सामंत यांचा असणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT