मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झाली आहे. अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबईच्या किला कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून तपास यंत्रणांसमोर हजर झाले नाहीत. तपास यंत्रणांनी त्यांना अनेकदा समन्स बजावले आहेत. त्यामुळेच आता कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सिंग यांच्याशिवाय विनय सिंग आणि रियाझ भाटी यांच्याविरोधातही न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. गुन्हे शाखा अनेक दिवसांपासून परमबीर सिंगसह अनेक आरोपींचा शोध घेत आहे.
परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांच्यामार्फत 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या संदर्भात परमबीर यांनी अत्यंत गंभीर आरोप करणारं एक खळबळजनक पत्र लिहिलं होतं, त्यानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. याच पत्रामुळे अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्री पद देखील गमवावं लागलं होतं. आता याच वसुली प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
दरम्या,न याच प्रकरणात छोटा शकीलचा जवळचा रियाझ भाटी हा देखील आरोपी असून तोही सध्या बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे यावर्षी 4 मेपासून रजेवर आहेत. यानंतर त्यांनी दोनदा रजाही वाढवून घेतली होती. पण त्यानंतर त्यांनी आपण गैरहजर का आहोत याबाबत कोणतीही माहिती दिली नाही किंवा ते कर्तव्यावर परतले देखील नाही.
परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. परमबीर सिंग हजर न राहिल्याबद्दल आयोगाने आतापर्यंत दोन जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
दुसरीकडे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, परमबीर सिंग चंदिगडमध्ये असू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मुंबईत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाच्या कारवाईदरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड आणि आसिफ लुंपवाला यांनी हजर राहून त्यांच्या वतीने पॉवर ऑफ अॅटर्नीसह प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
आमच्याकडे तक्रारदार गायब, तरीही केस सुरूये; उद्धव ठाकरेंचा परमबीर सिंहांना टोला
नेमकं प्रकरण काय?
अनेक गुन्हे प्रकरणात परमबीर सिंग यांचं नाव आल्यानंतर ते फरार झाल्याचंही बोललं जात आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अर्ज दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
परमबीर सिंग यांनी दोन हॉटेल आणि रेस्तराँवर धाडी न टाकण्यासाठी 9 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप केलेला आहे. त्याचबरोबर 2.92 हजार किंमत असलेले दोन स्मार्टफोन घेऊन देण्यासाठीही परमबीर सिंग यांनी जबरदस्ती केली होती, असंही अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे. दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना जानेवारी 2020 आणि मार्च 2021 मध्ये घडली होती.
ADVERTISEMENT