वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत 2 कोटी 17 लाख रुपयांचा कर न भरल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील नामांकित सुनील फार्मा इंजिनिअरिंग कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.सुनील फार्म कंपनीच्या मालक जाई दीपक पाटील उर्फ जाई अमर पाटील सोनवणे यांच्या विरोधात उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सुनील फार्म कंपनीने अनेक घोटाळे केल्यानंतर आता कर बुडवी केली असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
उस्मानाबाद शहरातील जिल्हा स्टेडियम येथे 15 डिसेंबर 2010 पासून कार्यरत असलेल्या सुनील फार्मा कंपनीने सुनील प्लाझा नावाची वास्तू उभी करताना अनेक नियमांचे भंग केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते तसेच अन्य ठिकाणी व्यापारी संकुल उभी करताना केलेली फसवेगिरी मागील काही वर्षापूर्वी चांगलीच चर्चेत होती त्यानंतर आता या कंपनीचा आणखी एक करानामा उघड झाला आहे.वस्तू व सेवा कर विभागाने आता त्यांच्यावर कारवाई केली आहे. मूल्यवर्धित कर कायदा 2002 चे कलम 23(2) नुसार झालेल्या निर्धारणेप्रमाणे वित्तीय वर्ष 2013-2014 या काळात कर व त्यावरील व्याज आणि दंड असे 2 कोटी 16 लाख 96 हजार शासनाकडे भरले नाहीत. वस्तू व सेवा कर विभागाने सुनील फार्म यांना वारंवार संपर्क साधून कारणे दाखवा नोटीस दिल्यावरही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 मधील कलम 74(2) नुसार आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब बोबडे हे याचा तपास करीत आहेत.
वस्तू व सेवा कर सोलापूर विभागाचे राज्यकर सहआयुक्त निरंजन जोशी, उस्मानाबाद जिल्हा कार्यालय प्रमुख अभिजीत पोरे, राज्यकर अधिकारी रामचंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर निरीक्षक शिवनारायण माने यांनी पोलिसात तक्रार देऊन ही मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर करबुडव्या कंपनी व त्यांच्या मालकात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT