नागपूर शहरातील मनकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीकृष्ण धाम परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा आज मृत्यू झाला. राहुल इवनाते असं या तरुणाचं नाव असून हा मृत्यू कुणाल हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत मृत युवकाच्या नातेवाईकांनी आज रुग्णालयात तोडफोड केली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुणालच्या छातीत अचानक दुखायला लागल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला जवळच्या कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
मृत युवकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर राहुलचा ECG रिपोर्ट काढण्यात आला. यानंतर १५ मिनीटांनी डॉक्टरांनी तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. परंतू डॉक्टरांनी दिलेला ECG रिपोर्ट हा एका महिला रुग्णाचा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्या रिपोर्टरवर नाव खोडून राहुलचं नाव लिहीण्यात आलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर राहुलच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना याबद्दल विचारणा केली.
यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना आपल्यासमोर राहुलचा ECG रिपोर्ट काढायला लावला. या रिपोर्टमध्ये राहुल जिवंत असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. दुसरा रिपोर्ट समोर आल्यानंतर डॉक्टरांनी माफी मागितल्याचंही राहुलचं नातेवाईक म्हणाले. या हलगर्दीपणामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. दरम्यान यानंतर राहुलला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतू तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला आहे. राहुलचा मृतदेह यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधारे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT