इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आपल्या रंगेल पतीचे काळे धंदे उघड करण्यासाठी एक अनोखा मार्ग पत्नीने अवलंबला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती हा स्वत: पोलीस कर्मचारी आहे. पतीचा रंगेलपणा उघड करण्यासाठी पत्नीने प्रथम फेसबुकवर बनावट नावाने एक आयडी तयार केला. यानंतर नवऱ्याला तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीने ही फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करताच दोघांचं चॅटिंग देखील सुरू झालं. पोलीस कर्मचाऱ्याला असं वाटलं की, एखादी दुसरी मुलगीच त्याच्याशी प्रेमाच्या गुलूगुलू गप्प मारतेय. त्यामुळे त्याने चॅटिंगवर थेट Kiss आणि Sex ची मागणी केली. पण त्यानंतर जेव्हा या चॅटिंगनंतर खरी बायकोच समोर आली तेव्हा पोलीस पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
इंदूरच्या सुखलिया येथील रहिवासी असलेल्या मनिषा चावंडचा विवाह सत्यम बहल या तरुणाशी 2019 साली झाला होता. काही दिवस सत्यमने मनिषाला चांगली वागणूक दिली, मात्र काही दिवसातच त्याने तिचा छळ सुरू केला. मनिषाने केलेल्या आरोपानुसार, सत्यम हा किरकोळ गोष्टीवरून पत्नीला अनेक तास बाथरूममध्ये कोंडून ठेवायचा. तसेच अनेकदा बेदम मारहाण देखील करायचा.
अखेर वैतागलेल्या मनिषाने तिच्या आई-वडिलांकडे याबाबत तक्रार केली, ज्यानंतर तिने पोलिसातही एफआयआर नोंदवली. 28 नोव्हेंबर 2020 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पतीने घरात वर्तमानपत्रही वाचू देत नसे, असे नमूद केले आहे. एवढेच नाही तर सत्यम हुंडा म्हणून सतत मोटारसायकलची मागणी करत होता. असाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पण सध्या आरोपी पती जामिनावर बाहेर आहे आणि हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
माहेरी असताना पीडित मनिषाला पतीवर संशय आल्याने तिने त्याला फेक फेसबुक आयडीने रिक्वेस्ट पाठवली. सोशल मीडियावर स्वत:ला सिंगल सांगणारा सत्यम आता त्या महिलेशी रोज बोलू लागला. दरम्यान, एके दिवशी फेसबुक चॅटवर स्वत:च्या पत्नीला दुसरी तरुणी समजून पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याकडे चुंबन आणि सेक्सची मागणी केली. आता याच चॅटिंगचे स्क्रीन शॉट घेऊन पीडितेच्या पत्नीने न्यायालयात पुरावा म्हणून सादर केला आहे.
पीडितेच्या आरोपावरून इंदूर जिल्हा न्यायालयाने आरोपीविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सोमवारी पत्नीला खर्च म्हणून 2 लाख रुपये, तसेच दरमहा ७ हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहे.
वकील कृष्णकुमार कुन्हारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 2020 मध्ये पीडितेने तक्रार करून न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर जिल्हा न्यायालयाने दखल घेत पतीला दरमहा 7000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंतची ही थकीत किंमत 2 लाखांहून अधिक झाली आहे.
त्याचवेळी पतीचे सत्य उघड व्हावे, या उद्देशाने पीडित पत्नीने दुसरी मुलगी असल्याचे भासवून आपल्याच पतीशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केलं. पत्नीने टाकलेल्या या जाळ्यात पती अलगद सापडला. त्यामुळे आता पत्नी मनिषाने या सगळ्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मदतीची याचना केली आहे.
ADVERTISEMENT