presidential election 2022 : राष्ट्रपतींची निवड कशी होते?, मतदान कुणाला करता येतं?

मुंबई तक

• 09:11 AM • 11 Jul 2022

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची होत असलेली आणि महत्त्वाची मानली जात असलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक देशात होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्या भूमिका मांडल्या असून, आज (१८ जुलै) रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते, त्यात राज्यातील सत्ता समीकरणं कशी महत्वाची ठरतात, याचा घेतलेला आढावा… राष्ट्रपतीपदाच्या […]

Mumbaitak
follow google news

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची होत असलेली आणि महत्त्वाची मानली जात असलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक देशात होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्या भूमिका मांडल्या असून, आज (१८ जुलै) रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते, त्यात राज्यातील सत्ता समीकरणं कशी महत्वाची ठरतात, याचा घेतलेला आढावा…

हे वाचलं का?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते?

या निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीत सामान्य मतदार (म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्व निवडणुकीत मतदान करणारे), राष्ट्रपतींनी निवडून दिलेले राज्यसभेचे 12 सदस्य, लोकसभेतील 2 अँग्लो-इंडियन सदस्य आणि राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य यांना मतदान करता येत नाही.

मग मतदान कोण करू शकतं?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत केवळ सर्व राज्यातील विधानसभेचे आमदार आणि लोकसभा-राज्यसभेचे (राष्ट्रपतींनी राज्यसभेत नियुक्त केलेले 12 सदस्य वगळून) खासदार हे मतदान करू शकतात. लोकसभेची सदस्य संख्या आहे 545 पण त्यातले 2 अँग्लो इंडियन वगळले तर ते 543 आणि राज्यसभेचे एकूण खासदार असतात 245 सदस्यांपैकी राष्ट्रपतींनी निवडून दिलेले 12 खासदार वगळून 233 खासदार असे संसदेचे एकूण 776 खासदार या निवडणूक प्रक्रियेत मतदार असतात. आणि आता विधानसभेच्या विचार केला तर दिल्ली आणि पाँडिचेरीसारख्या केंद्रशासित प्रदेश मिळून सर्व राज्यांच्या विधानसभेचे आमदार या प्रक्रियेत समाविष्ट असतात.

मतांचं गणित कसं असतं?

ही मतदान प्रक्रिया समजून घ्यायला किचकट आहे, पण आपण विधानसभेचे आमदारांचं मत कसं काऊंट होतं, हे महाराष्ट्राचं उदाहरण पाहून समजून घेऊ… समजा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार असतील… (महाराष्ट्राची लोकसंख्या ही 5 कोटी 4 लाख 12 हजार इतकी आहे, 1971 च्या जनगणनेनुसार… 2026 पर्यंत ही 1971 चीच लोकसंख्या निर्धारित करण्यात आलेली आहे.) आता फडणवीस किंवा पवार यांचं एक मत कसं निश्चित होतं?

महाराष्ट्राची लोकसंख्या 5 कोटी 4 लाख आहे. त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्यसंख्येनं म्हणजे 288 ने भागायचं. याचं उत्तर जे येईल, ते भागिले 1000 करायचं आणि त्यातून 175 हे आपल्याला फायनल उत्तर मिळतं. म्हणजेच फडणवीस किंवा पवार यांच्यासारख्या विधानसभेच्या एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू येते 175. म्हणजेच एका आमदारने मतदान केलं की ते 175 व्होट्स म्हणून मोजलं जातं.

असे विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार… तर हे 288 गुणिले एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू जी आहे 175, याचं उत्तर येतं 50 हजार 400 अशाचप्रकारे इतर राज्यांच्या विधानसभेच्या आमदारांची सुद्धा व्हॅल्यू काढली जाते. देशातल्या सगळ्या विधानसभेच्या आमदारांची अशाच फॉर्म्यूल्यानुसार एकूण होते 5 लाख 49 हजार 474.

लोकसभा, राज्यसभेच्या खासदाराचं मत कसं मोजलं जातं?

लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 233 असे एकूण 776 खासदार राष्ट्रपतीपदी पदाच्या निवडणुकीत मतदान करतात. देशातल्या सगळ्या विधानसभेच्या आमदारांच्या मतांची व्हॅल्यू जी आहे 5 लाख 49 हजार 474 भागिले एकूण खासदार 776. याचं उत्तर येतं, 708. म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेच्या एका खासदाराच्या मताची व्हॅल्यू येते 708. असे सगळे खासदार म्हणजे 776 खासदार गुणिले एका खासदाराची व्हॅल्यू 708, याचं उत्तर आहे 5 लाख 49 हजार 408. अशाप्रकारे आमदार आणि खासदारांच्या मताची व्हॅल्यू निश्चित केली जाते.

जेव्हा मतदान होतं, तेव्हा आमदार आणि खासदारांना प्राधान्यक्रमाने मतदान करावं लागतं. म्हणजे A, B, C असे 3 उमेदवार असतील, पहिलं प्राधान्य C ला दुसरं प्राधान्य A ला आणि तिसरं प्राधान्य B ला असं देता येतं.

कुणालाच आवश्यक मतं मिळाली नाही, तर काय?

राष्ट्रपती म्हणून निवडून यायला किमान 50 टक्के मतं तरी गरजेची असतात. आता या उमेदवारांमध्ये कुणालाच 50 टक्के मतं मिळाली नाहीत, तर सगळ्यात कमी मतं असलेली व्यक्ती बाद होते. उदाहरणार्थ C ला सगळ्यात कमी मतं मिळाली, तर ती बाद होणार. आणि तिच्यासाठी मतदान केलेल्यांनी A आणि B ला जे प्राधान्य दिलं होतं, ते पुढे पकडलं जातं. त्यानुसार A आणि B मध्ये ज्याला 50 टक्क्यांच्यावर मतं मिळतील, ती व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडली जाते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलीये, तर भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएकडे मुर्मू यांच्या विजयासाठी पुरेशी मतं नाहीत. पण बाहेरची काही पक्षांनी पाठिंबा दिल्यास भाजपच्या द्रौपदी मुर्मू या विजयी होतील अशी शक्यता आहे.

अपेक्षेप्रमाणे वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, बसपा आणि शिरोमणी अकाली दलाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर शिवपाल सिंह आणि ओमप्रकाश राजभर यांनीही त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणुकीत मुर्मू विजयी होतील, अशी स्थिती आहे.

बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अकाली दलाची मतं यशवंत सिन्हा यांना मिळतील अशी आशा विरोधकांना होती, पण सुरुवातीपासूनच या तिनही पक्षानी सुरूवातीपासून अंतर ठेवलं होतं. त्यामुळे भाजप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वरचढ ठरताना दिसत आहे.

    follow whatsapp