– इम्तियाज मुजावर
ADVERTISEMENT
सातारा : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रालाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. परतीच्या पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील तब्बल 200 हेक्टरवरील स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान झालं आहे. मदर प्लांट मध्ये लावलेली लाखो रोपं उलमडून पडली आहेत. त्यामुळे कोरोनातील दोन वर्षानंतर होत असलेल्या हंगामातही शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
दिवाळीच्या हंगामात स्ट्रॉबेरी महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना चांगला दर देऊन जाते. दिवाळीत 700 रुपये किलोपर्यंत स्ट्रॉबेरी विक्रीसाठी येते. पण परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडाचा घास ओढून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
एकरी लाखो रुपये स्ट्रॉबेरी उत्पादनाला खर्च झाला आहे. पण आता दिवाळी हंगामात नुकसानच हाती लागणार आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी स्ट्रॉबेरी ग्रोवर्स असोसिएशन सह स्ट्रॉबेरी पीक उत्पादक शेतकरी व जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी केली आहे.
राजपुरी, भिलार, पाचगणी, नाकींदा, कासवंड, माचूतर भिलार, गुताड, क्षेत्र महाबळेश्वर अशा स्ट्रॉबेरीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वच भागात तुफान पाऊस पडला आहे. या भागातील 200 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहिलं आहे. त्यामुळे अती पावसाने स्ट्रॉबेरीची रोपे कुजून आणि सडून जाऊ लागली आहेत. एकूणच दिवाळीच्या हंगामातच निसर्गाने शेतकऱ्याच्या पाठीवर नुकसानीची कुऱ्हाड चालवल्याची खंतही राजपुरे व्यक्त करतात.
ADVERTISEMENT