राज ठाकरेंच्या भाषणाचा इफेक्ट? हनुमान चालीसा पुस्तकांच्या विक्रीत 30-40 टक्क्यांनी वाढ

मुंबई तक

• 09:29 AM • 20 Apr 2022

– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्यातील भाषणात मशिदीवरील भोंगे आणि त्याला उत्तर म्हणून हनुमान चालीसेचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या राजकीय परिस्थिीतीचा परिणाम आता भोंगे आणि हनुमान चालीसेच्या विक्रीवर होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये धार्मिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी हनुमान चालीसेच्या पुस्तकांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं. राज ठाकरेंनी केलेल्या […]

Mumbaitak
follow google news

– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्यातील भाषणात मशिदीवरील भोंगे आणि त्याला उत्तर म्हणून हनुमान चालीसेचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या राजकीय परिस्थिीतीचा परिणाम आता भोंगे आणि हनुमान चालीसेच्या विक्रीवर होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये धार्मिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी हनुमान चालीसेच्या पुस्तकांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानंतर हनुमान चालीसेच्या पुस्तकांची मागणी दुप्पटीने वाढल्याचं अहमदनगरमधील उदय एजन्सीचे मालक विवेक कुलकर्णी यांनी सांगितलं. हनुमान चालीसेच्या पॉकेट साईज पुस्तकांची प्रत्येक दिवशी 100 प्रति विकल्या जात होत्या. परंतू हनुमान चालीसेचा मुद्दा राज्यात तापल्यानंतर या संख्येत वाढ झाली आहे. महिन्याकाठी आता हनुमान चालीसेच्या 6 हजार प्रति विकल्या जात असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

अहमदनगरमध्ये दरवर्षी होळी ते हनुमान जयंती या काळात हरिनाम सप्ताह, हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमध्ये पूर्वी चालीसेची पुस्तकं वाटली जायची. राज ठाकरेंनी केलेल्या आव्हानानंतर आता युवकही हनुमान चालीसेची पुस्तक विकत घेत असून अन्य धार्मिक कार्यक्रम ते वाढदिवसातही हनुमान चालीसा वाटली जात असल्याचं कुलकर्णी यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं.

…लक्षात ठेवा, देवही तुमचा उद्देश बघतोय ! हनुमान चालीसा प्रकरणात महंतांनी पिळले कान

जी परिस्थिती हनुमान चालीसेबद्दल आहे तीच परिस्थिती भोंग्यांच्या विक्रीबद्दल असल्याचं कळतंय. कोरोनामुळे दोन वर्ष लॉकडाउनच्या काळात सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम बंद झाल्यामुळे भोंग्याची मागणी कमी झाली होती. पूर्वी राजकीय नेत्यांच्या सभा, लग्नसमारंभात भोंग्याचा वापर व्हायचा. कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात आल्यानंतर जुने भोंगे दुरुस्तीसाठी येत असून नवीन भोंग्यांच्या मागणीतही वाढ झाल्याचं नगरमधील स्थानिक इलेक्ट्रॉनीक दुकानाचे मालक बाळासाहेब परभणे यांनी सांगितलं. भोंग्यांच्या मागणीतही अंदाजे 30 ते 40 टक्के वाढ झालेली असून सध्या भोंग्याची किंमत 600 ते 800 रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय.

महाराष्ट्रातील एक गाव जिथे हनुमानाची पूजा करणं दूर, ‘मारूती’ची गाडीही घेतली जात नाही

    follow whatsapp