राज्यसभा निवडणूक: ‘वर्षा’वरच्या बैठकीतील Inside स्टोरी, मुख्यमंत्र्यांनी आखली रणनिती!

ऋत्विक भालेकर

• 05:34 PM • 03 Jun 2022

मुंबई: राज्यसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी आज (3 जून) अखेरचा दिवस होता. मात्र, कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने आता महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होणार एवढं निश्चित. निवडणूक होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण या बैठकीतून काहीही […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी आज (3 जून) अखेरचा दिवस होता. मात्र, कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने आता महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होणार एवढं निश्चित. निवडणूक होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण या बैठकीतून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर महाविकास आघाडीने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली. निवडणूक होणार हे निश्चित होताच महाविकास आघाडीची एका अत्यंत महत्त्वाची बैठक ‘वर्षा’वर पार पडली. याच बैठकीतील Inside Story आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

हे वाचलं का?

राज्यसभा निवडणूक: महाविकास आघाडीच्या बैठकीत काय घडलं?

राज्यसभा निवडणुकीतून भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी रणनिती ठरविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ‘वर्षा’वर बैठक पार पडली. जाणून घ्या बैठकीत नेमकं काय घडलं.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या या बैठकीत राज्यसभेसाठी लागणारं संख्याबळ आणि आकड्यांवर प्राथमिक चर्चा झाली. तिन्ही पक्षातील प्रतिनिधींची एक तज्ज्ञ कमिटी बनविण्यात येईल. ही कमिटी पक्षांतील आमदारांना मतदान कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. याच बैठकीत घटक पक्षांबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.

आम्हाला आमचं बळ दाखवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली: राऊत

दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेना नेता संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, ‘मुख्यमंत्र्यांसोबत मविआ प्रमुख नेत्यांची बैठक झाली. राज्यसभेची ही निवडणूक आम्ही स्वीकारली आहे. खरं तर या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला आमचं बळ दाखवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. खरं तर आम्हाला आमचं बळ दाखवायची गरज नाही. पण विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली आहे. ज्याचा त्यांना नक्कीच पश्चाताप होणार आहे.’

‘या निवडणुकीत मविआचे चारही उमेदवार निवडून येतील. त्यामुळे कोणीही शहाणपणा करू नये. यावेळी अजिबात घोडेबाजार होणार नाही. खरं तर केंद्रीय एजन्सी दबाव टाकत आहेत पण जिंकणार आम्हीच.’ असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Rajyasabha Election : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली? छगन भुजबळ म्हणाले..

दिवसभरात काय-काय घडलं?

महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेले होते. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते.

दुसरीकडे भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मुंबई तकसोबत चर्चा केली होती. आमचा पर्याय मान्य केला नाही तर आम्ही तीन जागा लढवणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तीन जागा लढवण्याच्या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. असं महाजन यांनी म्हटलं होतं.

भाजपच्या नेत्यांशी ‘मुंबई तक’चे संपादक साहिल जोशी यांनी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की, भाजप आता माघार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल असं वाटलं होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे निवडणूक होणारच!

फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी मीडियाला माहिती देताना सांगितलं की, ‘महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी एक तासभर चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊ. तर आमचा प्रस्ताव असा होता की, तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या आणि विधान परिषदेची पाचवी जागा आम्ही लढवणार नाही. त्यानंतर कुठलाच संवाद माहाविकास आघाडीकडून झाला नाही. वेगळ्या बातम्या कानावर येत आहेत. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, या सगळ्यानंतर आता वर्षावर एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघणार आहे.

    follow whatsapp