मुंबई: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड करत शिवसेनेतून चाळीस आमदार फोडले. पण शिंदेंना जमलं नाही, ते अवघा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एका फटक्यात केलं आहे. राज ठाकरे यांनी भाऊ उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट हल्ला चढवला. एवढंच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या कुटुंबावरही खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे रश्मी ठाकरेंबद्दल (Rashmi Thackeray) उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं आणि त्यानेच चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाने शिवसेनेत उभी फूट पाडली. या फुटीला ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक कारणीभूत असल्याचे आरोप केले. त्यांच्यावर सनसनाटी आरोप केले. पण आता राज ठाकरेंनी या बंडाला दुसरंतिसरं कुणी नाही, तर बंधू उद्धव ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. 23 जुलैला झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी उद्धव यांच्या कुटुंबावरही निशाणा साधला आहे.
हे व्हायला मुळात कारणीभूत कुटुंबातीलच लोकं- राज ठाकरे
मूळ स्त्री जी असते ती कुटुंब सांभाळते आणि तिच्यामुळे कुटुंब विखुरलं जातं. शिवसेनेच्या बाबतीत म्हणायचं का? कुटुंबानं शिवसेना जी आहे ती विखुरली गेली किंवा फुटली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज म्हणाले ”म्हणूनच त्या लोकांना थेट आरोप करता येत नाहीत. म्हणून मग संजय राऊतांसारखं काहीतरी माध्यम निवडायचं आणि आपल्या मनातील राग त्याच्यावर काढत बसायचा किंवा अजून कोणावर तरी. मुळात कारणीभूत कुटुंबातलीच लोक आहेत.”
Raj Thackeray :”विरोधात असतील तरीही अजित पवारांचं कौतुक करायला हवं”
”फुटलेल्या आमदारांना विचार ‘हीच’ कारणं समोर येतील”
”राजकारणात आणि सगळ्या व्यवहारात ज्यावेळेला त्यांचा हस्तक्षेप वाढत गेला, पहिल्यापासून त्याच्यातूनच या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. होत गेल्या… माझंही बाहेर पडणं त्याचमुळे होतं. तुम्ही एकांतात कधीतरी या आमदारांना किंवा शिंदेना विचारा…. कारण काय तुमचं. तेव्हा तुम्हाला हीच कारणं मिळतील” असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे?
राज यांनी कोणाचंही नाव न घेता प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत थेट भाऊ उद्धव ठाकरेंच्या कुटुंबावर निशाणा साधला आहे. वहिनी रश्मी ठाकरेंवरच राज यांचा हा निशाणा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंवर ज्या टीका झाल्या त्यांच्या केंद्रस्थानी कधीच रश्मी ठाकरे आल्या नव्हत्या. पण बंड निर्णायक टप्प्यावर असताना राज ठाकरेंकडून झालेला हा हल्ला महत्त्वाचा मानला जातोय.
येत्या काळात रश्मी ठाकरेंवर थेट आरोपांना सुरूवात करून देणारा हा हल्ला असल्याचंही म्हटलं जातंय. राज ठाकरेंच्या कौटुंबिक टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, ही टीका योग्य आहे का, ते तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा.
ADVERTISEMENT