महाराष्ट्रात यावर्षी पुराने थैमान घातलं होतं. कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी पूर आला होता. पावसाचा कहर पाहण्यास मिळाला. त्याचप्रमाणे 2019 मध्ये पुराचा फटका बसला होता. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला होता. सरकारकडून नुकसान भरपाईसाठी पंचनामेही करण्यात आले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाधितांना 2019 सालच्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याने अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापुरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
2019 मध्ये आलेल्या महापुरानं प्रचंड नुकसान झालं होतं. 5 हजार रोखीने 10 हजार बँक खात्यांमध्ये छोट्या दुकानदारांना 50 हजार रुपये, जनावरांचं नुकसान असेल तर त्याला 20 हजार रुपये तसेच घरांच्या पडझडीसाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा छोटा व्यावसायिक असेल या सर्वांना आपण विनाविलंब मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रत्येक भागातून 2019 साली जशी मदत झाली तशी मदत यावेळी झाली पाहिजे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजे.’ असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT