मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जिथे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या तुरुंगात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासातील महत्त्वाची भूमिका असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आता अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्याबाबत एकापाठोपाठ एक असे आरोप करत आहेत. ज्याला आता समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांकडून उत्तर दिलं जात आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या जात, जन्म प्रमाणपत्राबाबत अनेक गंभीर आरोप केले. दुसरीकडे एका NCB मधील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर करता समीर वानखेडेंवर खळबळजनक आरोप करणारं पत्र लिहलं आहे. जे मंत्री नवाब मलिक यांनी सर्वांसमोर आणलं आहे.
नवाब मलिक यांचा दावा आहे की, हे पत्र त्यांना एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिले असून त्यात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
या पत्रात समीर वानखेडेंवर जवळजवळ 26 आरोप केले आहेत. यात प्रामुख्याने असं म्हटलं आहे की, समीर वानखेडे स्वत: ड्रग्स प्लांट करुन लोकांना खोट्या केसेसमध्ये अडकवतो. तसंच बॉलिवूडमधील अनेकांना खोट्या केसमध्ये अडकवून करोडो रुपये उकळतात.
दरम्यान, नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला देखील काही महिन्यांपूर्वी ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. अखेर तब्बल 8 महिन्यानंतर समीर खान हा जामिनावर बाहेर आला. ज्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे खोटे छापे मारत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
दरम्यान, नवाब मलिकच्या हल्ल्याची तीव्रता पाहून आता समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांन पुढे येत आता या आरोपांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपांबाबत समीर वानखेडे यांच्या बचावात त्यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन या माध्यमांसमोर आल्या. त्यांनी समीरच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र दाखवत नवाब मलिक यांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
पाहा क्रांती रेडकर नेमकं काय म्हणाली
नवाब मलिकच्या या आव्हानानंतर समीर वानखेडेचे कुटुंबही समोर आले. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रमाणपत्रे दाखवली आहेत.
यावेळी क्रांती रेडकर यांनी असं म्हटलं आहे की, ‘समीर वानखेडे यांच्या दाखला पाहा, त्यांच्या संपूर्ण वानखेडे कुटुंबाचा दाखला पाहा’, असं थेट सांगितलं आहे. ‘त्यांच्या जातीच्या दाखल्यावर जी जात लावण्यात आली आहे तीच खरी आहे. एक व्यक्ती खोटे प्रमाणपत्र बनवू शकतो. पण संपूर्ण गाव तर खोटं प्रमाणपत्र बनवणार नाही ना. माझ्या सासऱ्यांनी मूळ प्रमाणपत्र दाखवले आहे. हे आम्ही रोज-रोज खपवून घेणार नाही आणि खुलासाही देणार नाही. माझा नवरा खोटारडा नाहीए.’
क्रांतीने असंही म्हटलं की, ‘आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने आम्हाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर समीरला एनसीबीमधून काढून टाकल्यास त्याचा फायदा अनेकांना होईल म्हणून हे सगळे प्रयत्न सुरु आहे.’
समीर वानखेडेंच्या बहिणीचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर
समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे म्हणाल्या की, ‘नवाब मलिक यांच्याकडे अशी कागदपत्रे असतील तर ते न्यायालयात का जात नाहीत? ते मीडियासमोर का वेळ वाया घालवत आहेत. त्यांना आम्ही न्यायालयात उत्तर देऊ.’
‘तो (नवाब मलिक) समीर वानखेडेचा जन्म दाखला का शोधतोय, तू आहेस कोण? असंही यास्मिन म्हणाल्या. यास्मिनने असेही सांगितले की, आम्ही सरकारी कागदपत्रे दाखवली, त्यातच सर्वकाही आहे. मला विश्वास आहे की, यातून समीर वानखेडे बाहेर पडतील.’ असं त्या म्हणाल्या.
वडिलांनीही केला बचाव
‘आज तक’शी बोलताना समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी ट्विटर जे प्रमाणपत्र शेअर केलं आहे तेच मुळात बनावट आहे. ते प्रमाणपत्र छेडछाड करून तयार करण्यात आले आहे. असं ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले आहे.
समीर वानखेडेचे वडील पुढे असं म्हणाले की, ‘मी जन्माला आलो तेव्हापासून माझे नाव ज्ञानदेव आहे. माझे नाव दाऊद कोणालाही माहीत नाही. हे सर्व आता मंत्री नवाब मलिक घडवून आणत आहेत. माझ्या संपूर्ण कुटुंबावर कधीही कोणताही आरोप लावण्यात आलेला नाही.’
एकंदरीत एकीकडे नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात आघाडी उघडली आहे तर दुसरीकडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रभाकर सईल याने आर्यनला सोडवण्यासाठी 25 कोटींच्या डीलमध्ये समीर वानखेडेचा हात असल्याचे सांगून त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. या डीलच्या आरोपांबाबत एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.
NCB चं पाच सदस्यीय पथक दिल्लीहून मुंबईला येणार, समीर वानखेडेंवरच्या आरोपांची चौकशी होणार?
नवाब मलिक यांनी नेमके काय आरोप केले आहेत?
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी SC असल्याचे बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवली आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण लवकरच छाननी समितीकडे जाईल आणि सत्य देशासमोर येईल, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना मलिक म्हणाले की, ज्या दलित बांधवाचा हक्क त्यांनी हिसकावला, तो त्यांना आम्ही मिळवून देऊ. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
यासोबतच नवाब मलिक यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, मी दिलेले प्रमाणपत्र खोटे असेल तर त्यांनी पुढे यावे अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांनी खरे प्रमाणपत्र दाखवावे.
ADVERTISEMENT