Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! संजय राऊतांविरुद्ध हक्कभंग

भागवत हिरेकर

01 Mar 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 11:32 AM)

sanjay Raut face privilege after controversial statement : संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. संजय राऊतांविरोधात भाजप-शिवसेनेचे आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आली.

sanjay raut

sanjay raut

follow google news

sanjay Raut controversial statement : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे सभागृहात पडसाद उमटले. राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांनी त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.अतुल भातखळकर, भरत गोगावले यांनी तशी तक्रार दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी चौकशी करून आदेश देणार असल्याचं जाहीर केलं.

हे वाचलं का?

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

कोल्हापूर येथे बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना एक विधान केलं. त्यावरून वाद निर्माण झाला. “सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. असे गेल्या सहा महिन्यात या सरकारने ईडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला. जे विरोधात आहेत. त्यांना तुरुंगात टाकायचं. खोटे गुन्हे दाखल करायचे. बदनाम करायचं. लक्षात ठेवा. 2024 ला याचा हिशोब केला जाईल”, असं विधान संजय राऊतांनी केलं.

“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं.

आशिष शेलार संतापले, राऊतांवर टीका

संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत भाजप आणि शिवसेनेनं त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली. भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, “राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असू शकतो. विधिमंडळाच्या स्थानाबद्दलचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. आमच्या समोर बसलेले काय भूमिका घेणार आहे? आरोप करू शकतो, पण एकमेकांना चोर म्हणू शकतो का? असा सवाल शेलार यांनी विरोधी पक्षनेते आशिष शेलार यांना केला.”

Maharashtra Budget Live: कांद्याच्या दरावरून विरोधकांनी घेरलं; शिंदे-फडणवीसांनी दिलं उत्तर

“चोर मंडळ बोल शकतो का? हे कायदे मंडळ आहे. चोरांना पकडण्यासाठी कायदे करणार मंडळ आहे. या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात महाराष्ट्राचा अपमान करायचा. हा महाराष्ट्रद्रोह आहे. कुणी यांना परवानगी दिली? इथे वायकर, प्रभू, साळवी बसलेले आहेत. माझं आवाहन आहे तुम्हाला, महाराष्ट्राच्याबद्दल ही भावना तुमच्या मनात असेल, तर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. या सदनाबद्दल आणि सदस्यांबद्दल असा भाव, या सदनात काय दाऊद आहे का? त्यांना तुम्ही चोर म्हणत नाही. या सदनात बसलेल्या सदस्यांना तुम्ही चोर म्हणता. या सदनातील मंडळाला तुम्ही चोरमंडळ म्हणता, माझी विनंती यावर कारवाई झाली पाहिजे. समोरच्या सदस्यांनी बोटचेपी भूमिका घेणं अपेक्षित नाहीये. विधिमंडळाच्या बाबतीत अशी भूमिका अजिबात अपेक्षित नाही,” असं शेलार म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार राऊतांच्या विधानावर म्हणाले…

अजित पवार म्हणाले, “आशिष शेलार यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे. आपण सगळे विधिमंडळातील सदस्य 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही व्यक्तिला अशा पद्धतीने चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाहीये. एक व्यक्ती विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याची बातमी आली आहे. आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. पक्षीय बाबी बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. कारण शेवटी प्रत्येकाने शिस्त, नियम पाळला पाहिजे.”

Mohit Kamboj:”भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना प्रवेशासाठी 100 कॉल केले”

“संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. परंतु काहीही बोलायला लागलं आणि असे आरोप करत असेल, तर… आता त्या बातमीत तथ्य आहे का? हे तपासलं पाहिजे. जे बोलले त्यांची बाजू घेतोय असं नाहीये. ते बोलले असतील, तर योग्य निर्णय घ्यावा. पण, त्यांची शहनिशा केली पाहिजे. अशा बाबतीत बातम्या येतात. कधी तथ्य असतं, नसतं. पण, जर ती व्यक्ती खरोखरच तसं बोलली असेल, तर मग ती व्यक्ती कुठल्याही राजकीय पक्षाची असो, कुठल्याही पदावर असो, त्यांना व्यवस्थित मेसेज देण्याचं काम आणि विधिमंडळाचा मानसन्मान ठेवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे, असं आमचं मत आहे.”

अतुल भातखळकरांनी दाखवला मोबाईल, अध्यक्षांकडे केली कारवाईची मागणी

भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, “अध्यक्ष महोदय, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जे विधिमंडळाचा अवमान करणारे उद्गार काढले आहेत. याच्याबद्दल मी आपल्याकडे हक्कभंगाची सूचना आधीच दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार असं म्हणाले की, एखाद्या नेत्याविषयी, एखाद्या पक्षाविषयी… दादा असं नाहीये. त्यांनी सरळ म्हटलं आहे की, विधिमंडळ नव्हे चोरमंडळ… सगळ्या विधिमंडळाचा अपमान आहे. आपण म्हणता हे तपासून पाहिलं पाहिजे. माझ्याकडे क्लिप आहे. त्यांनी त्यात सरळ म्हटलं आहे की, हे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ.”

“त्याच्यापुढे जाऊन गुंड मंडळ आहे. या विधिमंडळाला इतकी उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणापासून ते शरद पवारांपर्यंत… अशा विधिमंडळाला चोर म्हणताहेत. केवळ कोविडच्या केसमध्ये त्यांच्या जवळच्या माणसाला काल मुंबई पोलिसांनी अटक केली. ते नैराश्य ते विधिमंडळावर काढत आहेत का? हा विधिमंडळाचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. अध्यक्षांना माझी विनंती आहे की, आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा आणि याच्यावर तातडीने सुनावणी केली पाहिजे आणि हे बोलणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी माझी आपल्याकडे मागणी आहे”, असं भातखळकर म्हणाले.

बाळासाहेब थोरातांनी केला निषेध, शिंदेंच्या वक्तव्यावर ठेवलं बोट

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आशिष शेलारांनी हे मांडलं. आम्हाला अद्याप समजलं नाहीये. अजित पवारांनी सांगितलं की, ते टिव्हीवर सुरू आहे. पण, कुणीही असो, विधिमंडळ आपलं सर्वोच्च सभागृह आहे. महाराष्ट्राचं आदरस्थान आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्राचा कारभार विधिमंडळातून चालतो. एक थोर परंपरा असलेलं मंडळ आहे. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. असं म्हटलं आहे की नाही, हे तपासण्याची गरज आहे. सध्याचा काळात शब्दाचा वापर हा दोन्ही बाजूने जो होतो तो अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं निषेधार्ह आहे, तसंच आमच्या विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणं चुकीचं आहे. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शब्दांचा वापर सगळ्यांनी व्यवस्थित केला पाहिजे. कुणी चोरमंडळ म्हटलं असेल, तर ते आम्हाला मान्य नाही.

Exclusive : ठाकरेंआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार; गोऱ्हेंना दिलं पत्र

भरत गोगावले म्हणाले, “आशिष शेलार, भातखळकरांनी सांगितलं, ती वस्तुस्थिती आहे. आम्ही सगळ्यांनी क्लिप ऐकली आहे. चुकीचं कुणी बोलत नाहीये, आरोपही कुणी करत नाहीये. कोणत्याही गोष्टीचं प्रमाण आहे. त्या प्रमाणाबाहेर गेल्यानंतर अति तिथे माती ठरलेली आहे. हा हक्कभंग व्हायलाच पाहिजे. बाहेर प्रक्षोभ उसळायचा नसेल,.. कारण प्रचंड भावना भडकत आहे.

“या माणसाला हा अधिकार कुणी दिला. जर हे एवढे स्वतः शहाणे सांगताहेत. माणसाने *+ खायला पाहिजे, पण एवढा *##@ पणा नसायला पाहिजे, असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही सांगतोय की, याच्यावर हक्कभंग दाखल करावा. दादांनी जे सांगितलं की तो कुणीही असो. आमची सूचना मान्य करून घ्यावी”, अशी मागणी त्यांनी केली.

रवींद्र वायकर म्हणाले, “सभागृहात हक्कभंग आणलेला आहे आणि त्यांच्यावर ही चर्चा सुरू आहे. प्रामुख्याने चर्चा भरकटत चालली आहे. काही सदस्य भाड#@ शब्द वापरतात. भाड#@ म्हणजे काय? हे सभागृह महान आहे. बाहेर वापरलेले शब्द तुम्ही याठिकाणी काढता. भाड#@ शब्द मागे घ्यावा.” मागणीनंतर भरत गोगावले यांनी भाड#@ शब्द मागे घेतला. नितेश राणे, यामिनी जाधव, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट यांच्यासह इतर आमदारांनीही हक्कभंग आणण्याची मागणी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 8 मार्चला देणार निर्णय

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 272 अन्वये राज्यसभा खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरुद्ध विशेषाधिकारभंगाची सूचना उपस्थित केली आहे. विशेषाधिकारभंगाच्या सूचनेमध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधानमंडळ नव्हे, चोरमंडळ आहे, असं वक्तव्य केलं आहे. ही बाब विधिमंडळाच्या प्रतिनिधींसाठी अपमानास्पद असून, विधिमंडळाच्या उज्ज्वल परंपरा पायदळी तुडवणारी आहे. त्यातून संविधानाचा अवमान केलेला आहे. ही बाब गंभीर आहे. सभागृहाच्या घटनात्मक कारवाईवर प्रतिकुल परिणाम करणारी आहे. विधिमंडळ सदस्यांचा अवमान करणारे आहे. संजय राऊत यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कठोर कारवाई कऱण्यात यावी. सभागृहाच्या सदस्यांच्या विशेषाधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संवैधानिक जबाबदारी आहे. या प्रकरणाची दोन दिवसात चौकशी करून 8 मार्च 2023 रोजी सभागृहात पुढचा निर्णय जाहीर करेन”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

    follow whatsapp