भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार करण्यात आलेल्या भ्रष्ट्राचाराच्या काही आरोपांवर खुलासा करतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळा आणि पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात खळबळजनक आरोप केला. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपीसोबत किरीट सोमय्यांचा मुलगा भागीदार आहेत, असा दावा राऊतांनी केला.
ADVERTISEMENT
शिवसेना भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले,’जे रोज ततपप करत असतात. त्यांनी म्हणे पीएमसी बँक घोटाळा काढला. दुसरं एक पत्राचाळ. पीएमसी बँक घोटाळा आणि पत्रा चाळ या सगळ्यांशी त्यांनी आमचा संबंध लावला. माझं त्या बँकेत खातं नाही, ती बँक कुठे आहे, ते माहिती नाही. पत्रा चाळ अद्याप बघितली नाही. माझा मित्रपरिवार त्या व्यवसायात आहेत. ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांना अडकवलं गेलं आहे. मला त्रास देण्यासाठी. तो दलाल वारंवार हे सांगतोय की, पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे हे वापरत आहेत. राकेश वाधवान हा पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. आमचे सगळ्यांचे त्याच्याशी संबंध आहेत आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे आम्ही वापरत असल्याचा आरोप केला जातोय”, असं राऊत म्हणाले.
“मी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. राकेश वाधवानला त्या काळात कोण ओळखत नव्हतं. सगळेच ओळखत होते. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपला २० कोटी रुपये दिले गेले आहेत. पक्ष निधी म्हणून. हे सगळ्यांना माहितीये. हे महाशय आमच्याबद्दल बोलत आहेत. किरीट सोमय्या असं त्यांचं नाव आहे. ते म्हणतात राकेश वाधवान भयंकर माणूस आहे. त्याने भ्रष्टाचार केला. पीएमसी बँक घोटाळा केला. लोकांचा पैसा बुडवला. मी विचारू इच्छितो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे? निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी किरीट सोमय्यांची आहे. नील किरीट सोमय्यांची आहे आणि ते राकेश वाधवानचा पार्टनर आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
“निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनीसाठी पीएमसी बँक घोटाळ्यातील पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्याने वसई तालुक्यातील मौजे गोखिवरे इथे उभारला आहे. हे मी पुराव्यासह सांगतोय. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड राकेश वाधवानसोबत यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक प्रकरणात यांनीच वाधवानला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून कोट्यवधी रुपयाची जमीन त्यांचा फ्रंटमॅन असलेल्या लधानी म्हणून त्याच्या नावावर घेतली. कॅशही घेतली. ती ८० ते १०० कोटी घेतले”, असा आरोप राऊतांनी केला आहे.
“लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयांमध्ये घेतली केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा संचालक नील किरीट सोमय्या आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज टू असे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले जात आहेत. हा सगळा पीएमसी बँकेचा पैसा आहे. पर्यावरणासंबंधी परवानग्या नाही. अनेक नियमांची पायमल्ली केली आहे. हरित लवादानं कारवाई केली, तर त्याला २०० कोटींचा दंड होईल. माझं आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब लक्ष घाला. आधी या प्रकल्पाचे परवाने रद्द करा आणि नील आणि किरीट सोमय्यांना ताबडतोब अटक करा’, अशी मागणी राऊतांनी केली.
“पीएमसी बँक घोटाळा उघडकीस येण्याआधी किरीट सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी बँकेत पैसे काढून घेतले. ती यादी मी देईल. म्हणजे त्यांना घोटाळा होणार माहिती होतं. मूळात पीएमसी बँक घोटाळ्यातील व्यक्तीने किरीट सोमय्यांच्या माणसाला २०१५ साली जमीन का विकली? तेव्हा घोटाळा सुरू होता ना? भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माणूस आम्हाला अक्कल शिकवतोय. आम्हाला ज्ञान देतोय. एका बाजूला भ्रष्टाचारावर भजन करायचं, दुसऱ्या बाजूला मुंबई लुटायची. सगळी आरोप करायचे आणि आपले भ्रष्टाचार लपवायचे. हा किरीट सोमय्या भाजपचा मुंबईतील चेहरा आहे. देवेंद्र लधानी हा किरीट सोमय्यांचा फ्रंटमॅन आहे. त्याने राकेश वाधवानशी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आहे. सगळे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यातील आहे. पत्रा चाळीसंदर्भातील पैसैही यामध्ये आहेत. याची चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी,” अशी मागणी राऊतांनी केली.
“दुसरी गंमत म्हणजे पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करतेय. मी तीन वेळा ईडीकडे पाठवले. किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रं ईडीकडे पाठवले. ईडीवाले एक गुंठा, दोन गुंठा वाल्यांना बोलवता आणि हा किरीट सोमय्या दररोज ईडीच्या कार्यालयात बसून दही खिचडी खात असतो. त्याच्या बापाचं राज्य आहे का? तुम्ही आमच्या मंत्र्यांना बोलावणार. तुम्ही आमच्या आमदारांना बोलावणार. तुम्ही मराठी माणसांना बोलावणार. ईडीचा भ्रष्टाचार इतका खोलवर आहे की, हे सगळे लोक ईडीचे वसुली एजंट बनले आहेत. मी हे ठामपणे सांगतोय,” असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT