मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपबद्दल मोठं विधान केलं आहे. तुम्ही गप्प राहिलात, तर तुम्हाला उपराष्ट्रपती करू, असा इशारा दिला गेला होता. पण मी सांगितलं की मी असं करू शकत नाही, असं विधान सत्यपाल मलिक यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यपाल सत्यपाल मलिक राजस्थानच्या दौऱ्यावर होते. सत्यपाल मलिक झुंझुनूं जिल्ह्यातील बगड भागात होते. याच दौऱ्यादरम्यान सत्यपाल मलिक यांनी भाजपवरच निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले, ‘भाजपमध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटीचे छापे पडू शकतात. सरकारने भाजपमधील लोकांवरही छापे टाकू दिले पाहिजेत’, असं विधान सत्यपाल मलिक यांनी केली.
भाजपकडून सत्यपाल मलिक यांना होती उपराष्ट्रपती पदाची ऑफर?
सत्यपाल मलिक यांनी उपराष्ट्रपती पदाबद्दलही मोठा दावा केला. मलिक म्हणाले, ‘जगदीप धनकड उपराष्ट्रपती पदासाठी पात्र आहेत. मलाही तसे संकेत दिले गेले होते. मी जर सत्य बोलणं बंद केलं, तर उपराष्ट्रपती बनवू. पण मी स्पष्ट सांगितलं की, असं मी करू शकत नाही.’
केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांबद्दल मलिक म्हणाले, ‘मला जे जाणवतं, ते मी बोलतो. मग त्यासाठी मला काहीही सोडून द्यावं लागलं तरी चालेल.’ देशात बिगर भाजपा नेत्यांवर टाकले जात असलेले ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या छाप्याबद्दल मलिक म्हणाले की, भाजपतही असे लोक आहेत, पण त्यांच्यावर धाडी टाकल्या जात नाहीयेत. त्यामुळे देशात केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल असं वातावरण तयार झालं आहे. सरकारने स्वतःच्याही काही लोकांवर कारवाई करायला हवी. जेणेकरून देशात जे तपास यंत्रणाबद्दल दृष्टीकोन तयार झाला आहे, तो पुन्हा बदलेलं.”
सत्यपाल मलिकांनी केलं राहुल गांधींचं कौतुक
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कौतुक केलं. मलिक म्हणाले, “एक तरुण स्वतःच्या पक्षासाठी काम करतो आहे. एक नेता पदयात्रा करत आहे. आजच्या घडीला असं कुणीही केलं नसतं. त्यांच्या भारत जोडो यात्रेतून काय संदेश जाणार, हे लोकच सांगतील. पण राहुल गांधींना हे काम योग्य वाटतं आहे”, असं मत सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल मांडलं.
ADVERTISEMENT