मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार (Jayant Pawar) यांचं आज (29 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास निधन (Passed away) झालं. मिळालेल्या माहिती नुसार, मध्यरात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारदरम्यानच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं एक सच्चा पत्रकार, लेखक, नाटककार आणि समीक्षक गमावल्याची भावना साहित्य वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
जयंत पवार यांची ओळख नाटककार म्हणून असली तरीही ते मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात होते. साहित्य आणि नाट्य विश्वातील दिग्गज पत्रकार अशी त्यांची ओळख होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात त्यांनी मागील अनेक वर्ष ते कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात चौथी भिंत या विशेष सदरात त्यांचं नाटय समीक्षण प्रसिद्ध होत असे. दरम्यान, त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
जयंत पवार यांनी नाट्य क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. अनेक दर्जेदार नाटकं त्यांनी लिहली आणि ती व्यावसायिक रंगभूमीवर देखील चांगलीच गाजली. त्यांचं ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक देखील मागच्या काही काळात तुफान गाजलं. याच नाटकासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा पुरस्कार देखील बहाल करण्यात आला होता.
जयंत पवार यांचं ‘अधांतर’ हे नाटक देखील बरंच गाजलं होतं. याच नाटकाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबाग-परळ’ हा सिनेमा देखील प्रदर्शित करण्यात आला होता. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला होता.
जयंत पवार यांनी नाट्य लेखनासोबतच अनेक पुस्तकं देखील लिहली आहेत. 2014 साली महाडमध्ये झालेल्या 15 व्या कोकण मराठी परिषद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.
भारताला सर्वस्व मानणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ Dr. Gail Omvedt यांचं निधन
जयंत पवार यांची साहित्य संपदा
अधांतर (नाटक), काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक), होड्या (एकांकिका) यासारखं असंख्य दर्जेदार लेखन जयंत पवार यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT