मुंबई: आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
‘मुंबई तक’शी पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.
विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात. यावरच भाष्य करताना पवार म्हणाले, ‘काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.’
यावरच काँग्रेसच्या नेतेमंडळीमध्ये अजून अहंकाराची भावना आहे का, असा विचारल्यावर पवारांनी एक उदाहरण सांगितलं.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
‘मुंबई तक’शी बोलताना पवार म्हणाले, ‘मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.’
यावरच पवारांना म्हणजे काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असं विचारण्यात आलं. तेव्हा पवार म्हणाले, ‘तिथंक काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल.’
काँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष
‘मुंबई तक’शी बोलताना पवार यांनी काँग्रेसची आज दूरवस्था झालीय, असं असलं तरी हा आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले. एकप्रकारे पवारांनी दुबळी काँग्रेस हेच तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं स्पष्ट केलं.
प्रशांत किशोरची मला गरज नाही
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वर्तुळात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चाही सुरू आहे. याबद्दलच पवार म्हणाले, मला प्रशांत किशोरची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशा शब्दांत पवारांनी आपली भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल, याबद्दल सुतोवाच केलं.
ADVERTISEMENT