ADVERTISEMENT
तुळजापूरची आई तुळजाभवानी माता हे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत! वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमानं सुरू आहे.
विशेषतः शारदीय नवरात्रोत्सवात तुळजापुरातील आनंद अन् उत्साह बघण्यासारखा असतो.
सध्या तीच घाई महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव तोंडावर आल्यानं मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाकडून सुरू आहे.
दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाराज व जिजाऊ महाद्वार यासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे परिसर उजळून निघाला आहे.
देवीच्या महाद्वारावर ‘आई साहेब’ व ‘आई राजा उदो उदो’ असे विविध आकर्षक रोषणाईने लिहले आहे.
तुळजाभवानी व तुळजापूर मंदीर हे रोषणाईने नटले असुन ही आकर्षक रोषणाई कॅमेरात कैद करण्यासाठी व पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
पुणे येथील देवीभक्त उंडाळे व टोळगे बंधूंची तुळजाभवानी मातेवरील श्रद्धेपोटी गेल्या 7 वर्षापासून देवीची सेवा म्हणून मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करतात.
श्री श्रेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्ती पीठ! वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो.
साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते.
वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हटले जाते.
घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही.
भगताकडून सांगितल्या जाणाऱ्या माहितीप्रमाणे तुळजापूरची मूळ मूर्ती ही शालिवाहन म्हणजे सातवाहन कालखंडातील आहे.
सातवाहनांची राजधानी पैठण ही असून त्या ठिकाणच्या राजकीय उलथापालथीमुळे या घराण्यातील शंभूराजाने ही मूर्ती अंधेरी नगरी येथे आणून तिची प्रतिष्ठापना केली.
पुढे या घराण्यातील तेलंगा नावाचा राजा पराक्रमी असून तो देवीभक्त होता. अंधेरी नगरी परिसरातही आता यवनांचे आक्रमण व्हायला लागल्यानंतर स्वारीवर जाताना तेलंगाने देवीची मूर्ती आपल्यासोबत ठेवली.
एकदा तो दक्षिणेत स्वारीवर असताना त्याचा मुक्काम यमुनाचल प्रांतातील चिंचपूर (तुळजापूर) येथे पडला. दुर्दैवाने याच ठिकाणी राजा तेलंगाचे निधन झाले. त्यामुळे ही मूर्ती तुळजापुरातच राहिली.
मूर्तीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ही मूर्ती अहमदनगर निजामाच्या कालखंडात तुळजापुरात आणल्याचे सांगितले जात असले तरी श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीबाबतचा एक अस्सल पुरावा तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शिलालेखात सापडतो.
या शिलालेखात तुळजाभवानीची मूर्ती स्वत: स्थापित केल्याचा उल्लेख या शिलालेखात असून सदरचा शिलालेख हा शके १३२० म्हणजे इ. स. १३९८ चा असून परसराम गोसावी याने ही मूर्ती दिल्याचा उल्लेख यात आहे. शिलालेखाला अस्सल पुराव्याचे स्थान देण्यात येते हे महत्त्वाचे आहे.
ADVERTISEMENT