नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली गेली होती, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. या आरोपावरून आता आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
वैभव नाईक यांनी नितेश राणेंना काय दिलं उत्तर?
“याआधी सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, शिवसेनेचे कार्यकर्ते गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रला माहिती आहे,” असं आमदार वैभव नाईक म्हणाले.
“नितेश राणे हे आज उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत. खरंतर उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंनी सुद्धा शिवसैनिक संतोष परब हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या सुपारी मागे कोण होता, हे सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावरून लोकांसमोर आलेलं आहे.” हे वैभव नाईक यांनी म्हटलंय.
“एकनाथ शिंदे गट तयार झाल्यानं नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत. पण सुपारीबाज कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू,” असं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणेंना दिलं आहे.
नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय केला होता आरोप?
आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत गंभीर आरोप केला होता. नितेश राणेंनी एक ट्विट केलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच शिवसेना सोडल्यानंतर माझ्या वडिलांना संपवण्यासाठी तथाकथित शांत आणि सभ्य पक्षप्रमुखांकडून सुपारी दिली गेली होती. म्याऊ म्याऊ संपू द्या नंतर आम्ही वस्त्रहरण सुरू करू,’ नितेश राणे यांनी म्हटलं होतं. या सगळ्या आरोपांना वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली असून, आदित्य ठाकरे दौऱ्यावर असतानाच नितेश राणेंनी हे ट्विट केलं होतं. त्यामुळे शिव संवाद यात्रा संपल्यानंतर आम्ही वस्त्रहरण करून असा इशारा नितेश राणेंनी दिलेला आहे. मात्र आता या आरोपांना वैभव नाईक यांनी उत्तर दिलं आहे.
राजकीय हत्येचा मुद्दा चर्चेत का आला?
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात असताना शिंदे गटातील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरून थेट उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना जास्तीची सुरक्षा न देण्याचं तत्कालिन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंना सांगितलं होतं. कांदेंच्या या आरोपानंतर नितेश राणेंनी हे ट्विट केलं होतं.
ADVERTISEMENT