महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. पक्षीय बलानुसार या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची प्रत्येकी १ तर भाजपच्या दोन जागा निवडून येतील. उर्वरित सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. याचदरम्यान शिवसेनेनेही सहावी जागा लढवण्याचं जाहीर करत ही निवडणुक अधिक चुरशीची केली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून याबद्दलचे संकेत दिले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार करण्याची विरोधकांची इर्षा दिसून येतेय. भ्रष्टाचारातून पैसा आणि त्यातून घोडेबाजार हे दुष्टचक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल, कोणी कितीही आकडेमोड करावी…आकडे आणि मोड दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे..जितेंगे असं लिहीत शिवसेनेने सहाव्या जागेवर आपली दावेदारी सांगितली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी १-१ उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे काही मत शिल्लक राहतात. या मतांच्या जोरावर ते एक उमेदवार सहज निवडून आणू शकतात. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना आपला पाठींबा देण्याबद्दल सुतोवाच केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरीक्त मतांबाबत विचार करुन सहाव्या जागेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असं जाहीर केलं आहे. परिवहन मंत्री अनील परब यांनीही शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवेल असं जाहीर केल्यामुळे यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
ADVERTISEMENT