मुंबई : शिंदे साहेब ज्या ज्या गोष्टी करतील त्यांना विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. त्यांना जिथे तिथे शिंदे साहेब दिसतात. स्वप्नात देखील शिंदे साहेब दिसत असतील. गणेशोत्सवमध्ये ज्या प्रकारे ते फिरले, शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेतले, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करतो? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दिवसाचे 20 तास हा माणूस काम करतो हे त्यांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. ये तो अभि झाकी है पिक्चर अभि बाकी है, असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT
सरन्यायाधीश उदय लळीत आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे एकत्रित व्यासपीठावर वादात सापडले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही निमंत्रित होते. यावेळी बोलताना शिंदेंनी सरन्यायाधीशांचे तोंड भरुन कौतुक केले. महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वात देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य आणि ज्ञानमुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला.
जयंत पाटील यांनी आक्षेप नोंदविला :
मा. सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही, असे म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे.
काँग्रेसकडूनही आक्षेप :
या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सरन्यायाधीश मुंबईत आले, त्यांच्या सत्काराला मुख्यमंत्री उपस्थित होते. पण असंवैधानिक सरकार महाराष्ट्रात असताना सरन्यायाधीश मुख्यमंत्र्यांना कसे भेटतात? कारण सरकारवरच आक्षेप आहे आणि त्यांच्याच कोर्टात निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे या लोकशाहीत जनतेने कोणाकडे बघायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण लोकशाही, संविधान व्यवस्था धोक्यात आली असेल तर या सगळ्या गोष्टी, प्रश्न आवासून उभे आहेत, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.
तर शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरता स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासली जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते, अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसणे साहजिकच आहे, असा टोला काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT