जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
ADVERTISEMENT
खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील 29 वर्षीय महेंद्र नामदेव बेलसरे या अविवाहित तरुणाने स्वतःचे सरण रचून त्यामध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
गावालगत असलेल्या आपल्या शेतामध्ये महेंद्र बेलसरे या तरुणाने रात्री साडेसात वाजताच्या सुमारास सरण रचत ते पेटवून दिले आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली, ज्यामध्ये तो पूर्णपणे जळून खाक झाला आहे, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे, पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करत आहेत.
या संदर्भात मृत महेंद्र नामदेव बेलसरे याच्या भावोजींनी पोलिसांना सांगितले की, महेंद्र बेलसरे हा माझा मेहुणा आहे. तो शेती व्यवसाय करत होता. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता महेंद्र मला भेटण्यासाठी आला होता. मी पेट्रोल पंपावर काम करतो. पेट्रोल पंपावर महेंद्र आला आणि मला म्हणाला, मला कुणी मुलगी देत नाही. माझं लग्न करुन द्या. मी त्याला तुझ्यासाठी मुलगी पाहतो असं म्हटलं. त्यानंतर महेंद्र निघून गेला. यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
संध्याकाळी 5 वाजता तो पुन्हा मला भेटण्यासाठी आला. माझी पत्नी पुष्पा हिला भेटण्यासाठी तो घरी गेला. त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर रात्री 8 वाजता त्याच्या गावातून किशोर बेलसरे याने फोन केला. त्याने सांगितले की, महेंद्र याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. त्यानंतर मी घटनास्थळी जाऊन पाहिले असता महेंद्र बैलाच्या गोठ्यात मृतावस्थेत आढळून आला.
आपला मेहुणा महेंद्र बेलसरे याने लग्न जुळत नसल्याने नैराश्येतून स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्याच्या मृत्यूबाबत आपल्याला कुठलाही संशय नसल्याचंही त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT