कविता कृष्णमुर्ति, ज्येष्ठ गायिका
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मला अतीव दुःख झालं. मात्र जेव्हापासून मला संगीत काय हे कळू लागलं जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून लता मंगेशकर यांचं स्थान माझ्या हृदयात आहे. मी अनेकांकडून गाणं शिकले आहे. मात्र लताजींमुळे हे शिकू शकले की सिनेमासाठी पार्श्वगायन कसं करायचं. माझ्यासाठी त्या गुरूतुल्य होत्या. माझ्या शेवटचा श्वास आहे तोपर्यंत लतादीदी माझ्या हृदयात असतील. असा एकही दिवस जात नाही की मी लतादीदींचं गाणं ऐकत नाही.
लतादीदींची गाणी ऐकून मी अनेकदा रियाजही करते. लता मंगेशकर जसं गायच्या तसं गाण्याचा प्रयत्न करते. मी जोपर्यंत गाते आहे तोपर्यंत मी हे शिकत राहणार आहे. सर्वात पहिलं गाणं मी गायलं ते लतादीदींसोबतच. मला आठवतंय 1971 मध्ये एका बंगाली सिनेमासाठी आम्ही गाणं म्हटलं होतं. श्रीमान पृथ्वीराज नावाचा तो सिनेमा होता. हेमंतदा त्याचे संगीत दिग्दर्शक होते. मी त्या काळात हेमंतदांसोबत स्टेजवरही गात असे. त्यांच्यामुळेच मला हा सिनेमा मिळाला.
आजही मला तो दिवस आठवतो. त्यावेळी गाणं सलग रेकॉर्ड होत असे. त्यामुळे सिंगर्स केबिनमध्ये दोन माईक लावण्यात आले होते. मला फक्त चार ओळी गायच्या होत्या. त्यावेळी लतादीदींसोबत गायचं आहे मला माहित नव्हतं. त्यांना तिथे पाहून मी काहीशी नर्व्हस झाले होते. गाणं म्हणायची वेळ म्हणजेच फायनल टेकची वेळ जेव्हा आली तेव्हा मी माझ्या ओळी विसरले होते. कारण मी लतादीदींनाच बघत राहिली. मी जेव्हा विसरले तेव्हा त्यांनी त्यांचा चष्मा खाली केला आणि स्मितहास्य करत माझ्याकडे पाहिलं. त्यावेळी मी जे निरीक्षण केलं तेव्हा कळलं की एक किंवा दोन टेकमध्ये गाणं परफेक्ट गाणं हे लतादीदींना अगदी व्यवस्थित जमतं.
बहुतांशवेळा त्यांना दुसरा टेकही घ्यावा लागलेला नाही. त्या सिंगल टेकमध्येच गाणं ओके करत असत. मी ओळी विसरल्याने या गाण्याचा दुसरा टेक झाला. तो पण त्यांनी एकदम परफेक्ट घेतला. त्यानंतर खूप वर्षांनी डर सिनेमासाठी आम्ही एक गाणं करत होतो. त्यावेळी आमच्या दोघींच्या काही ओळी एकत्र होत्या. त्या ज्या पद्धतीने गाणं म्हणायच्या त्यापेक्षा थोडी वेगळी ढब होती. आम्ही त्या गाण्याचं रेकॉर्डिंग एकत्रच केलं होतं. त्यानंतर मी त्यांना बॉम्बे लॅब स्टुडिओत भेटले. त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की आपण जे गाणं एकत्र केलं होतं त्यातल्या गाण्याच्या माझ्या ओळी मी पुन्हा जाऊन गायले आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मलाही सांगायचं ना मी पण तुमच्यासोबत आले असते. तेव्हा त्या म्हणाल्या कविता तू उत्तमच गायली होतीस मी तसं गाऊ शकले नाही. इतकी वर्षे गाणं म्हणूनही त्यांच्यासारखा एखादा कलाकार उत्तम देता यावं यासाठी कसा आग्रही असतो हे मी त्यादिवशी पाहिलं.
त्यावेळी मला कळलं की लता मंगेशकर किती परफेक्शनिस्ट आहेत हे कळलं. त्यामुळे मी त्यांच्याकडून अशा अनेक गोष्टी शिकू शिकले. त्यांनी देशभक्तीपर गाणी म्हटली, भक्तीगीतं म्हटली, रोमँटिक गाणी म्हटली, ड्युएट गायली मी जेव्हा जेव्हा ती ऐकते त्यातून मी काही ना काहीतरी शिकत असते. लता मंगेशकर यांच्यासारखा कलाकार शतकानुशतकांमधून एकदा निर्माण होतो पुन्हा कधीही नाही हे त्यांचा आवाज ऐकल्यावर कळतं. माझी पिढी म्हणजे फक्त महिला गायिकाच नाही तर पुरूष गायकही त्यांच्याकडून पार्श्वगायन शिकले. आम्हाला त्या कायमच गुरूस्थानी राहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
ADVERTISEMENT