नाशिक: चुंबकाकडे (Magnet) लोखंड आकर्षित होतं हे आपण अगदी शाळेपासून शिकत आलो आहोत. पण हे असं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडल्याचं कधी ऐकलंय? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीराला लोखंड आणि स्टिल चिकटल्याचं कधी कानावर आलं आहे? नाही ना.. पण आता नाशिकमधल्या (Nashik) अरविंद सोनार यांच्या बाबतीत असं घडलं आहे.
ADVERTISEMENT
नाशिकच्या शिवाजी चौक भागात राहणाऱ्या अरविंद सोनार यांच्या शरीराला नाणी, चमचे अगदी ताटल्याही चिकटत असल्याचं समोर आलं आहे. सोनार यांच्या मुलाने सोशल मीडियावर वाचलेल्या एका मेसेजमुळे हा प्रकार समोर आला आहे.
कोरोनावरील लस घेतल्याने नेमकं काय होतं? जाणून घ्या सरळसोप्या भाषेत
लस घेतल्यावर शरीराला स्टील चिटकतं अशी बातमी सोनार यांच्या मुलाला मिळाली. त्यावर बातमी खरी आहे का ते पाहू म्हणून वडिलांच्या शरीराला त्याने स्टिलच्या वस्तू लावून पाहिल्या तर वस्तू चिकटत असल्याचं त्याला आढळून आलं.
यामुळे कोव्हिशिल्डचे (Covishield)लसीचे (Vaccine) दोन डोस घेतल्यामुळे अशा प्रकारे शरीराला स्टिल चिकटत असल्याचा दावा त्यांनी केलां आहे. पण लसीमुळे खरंच माणसाच्या शरीराला चुंबकत्व निर्माण होत असल्याची एकही घटना याआधी घडलेली नाही. त्यामुळे असं खरंच घडू शकतं का? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांचं मत जाणून घेतलं.
याबाबत डॉ. अशोक थोरात म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तीच्या शरीरात मॅग्नेटीक काही तयार झालं असेल तर तो संशोधनाचा विषय आहे. माझा वैद्यकीय कारकीर्दीत मी असं काही पहिल्यांदाच ऐकतो आहे. परंतु त्यांनी जो दावा केला आहे की, लस घेतल्यानंतर असं झालं आहे तो दावा मी आजच्या घडीला ग्राह्य धरु शकत नाही.’
‘याबाबत आपल्याला संशोधन करावं लागेल. आम्ही तशा सूचना तज्ज्ञ मंडळींना पाठवून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तो अहवाल आल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना शासन स्तरावर या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊ.’
लस न घेता फिराल तर होऊ शकतो मोठा दंड, जाणून घ्या कोणत्या शहरात घेण्यात आलाय हा निर्णय
‘त्यानंतर त्याबाबत शासन स्तरावर जो काही निर्णय होईल आणि जे काही चौकशी, संशोधन होईल तरच आपल्याला कोणत्या तरी निष्कर्षापर्यंत येता येईल.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, ही अजब घटनी नेमकी कशी घडत आहे हा खरं तर संशोधनाचाच विषय आहे. त्यामुळे याबाबत लवकरच नेमका काय तो खुलासा तज्ज्ञ करतील. मात्र, अरविंद सोनार यांच्या मुलाने जो दावा केला आहे त्याबाबत मात्र कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे आता याबाबत संशोधनाची अधिक गरज भासणार आहे.
ADVERTISEMENT