राज्यभरात एसटी महामंडळाच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशातच सांगली आगारात काम करणाऱ्या एका एसटी कंडक्टरचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालंय.
ADVERTISEMENT
राजेंद्र पाटील असं या कर्मचाऱ्याचं नाव असून ते कंडक्टर म्हणून कार्यरत होते. सध्या संप सुरु असल्यामुळे राजेंद्र पाटील हे घरातच होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन काहीकेल्या थांबत नाहीये. सरकारने कामावर परत न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला असून काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलंय.
राजेंद्र पाटील यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते चांगलेच तणावात होते. संपाबाबत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना चिंता व्यक्त केली होती. राजेंद्र यांना निलंबनाची भीती सतावत होती. याच तणावाखाली असल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्रतिक्रीया त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. राजेंद्र यांच्या निधनामुळे त्यांच्या नातेवाईकांसह जवळच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT