बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केली आहे. ही या एकूण प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट असून, सुदर्शन घुले या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. याप्रकरणी पोलिसांनी कालच एका डॉक्टरला ताब्यात घेतलं होतं. याच डॉक्टर वायबसे यांनी आरोपी सुदर्शन घुलेला पळून जाण्यात मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर आता काहीवेळापूर्वीच पोलिसांनी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी फक्त एका आरोपीची अटक बाकी आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> वाल्मिक कराडला आहे 'हा' आजार... नेमकं काय होतं त्यात?
बीडच्या मयत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बीड एस. आय. टी. च्या तपासात मोठी अपडेट समोर आली असून, मुख्य आरोपी सापडला आहे. सरपंच हत्याकांडातील संशयित डॉ.संभाजी वायबसे याला चौकशीसाठी पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं. डॉ. वायबसे यांना नांदेडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पुढच्या लिंक मिळाल्या आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. त्यामुळे वायबसेंनीच ही माहिती दिल्याची शक्यता आहे.
डॉ. वायबसे हे केज तालुक्यातील कासारीचे असून, त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता. एसआयटीकडून आरोपींची कसून चौकशी केली जात होती, त्यानेच दोन्ही आरोपींची माहिती दिल्याची शक्यता आहे. त्यानंतर आता हे दोन आरोपी सापडले आहेत. आता फक्त कृष्णा आंधळे हा एकच आरोपी फरार आहे. पोलीस त्याच्याही लवकरच मुस्क्या आवळतील अशी शक्यता आहे.
पो.स्टे.केज (जि.बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2),140(1),126, 118(1),34(4),324(4)(5), 189(2), 190 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल गंभीर व संवेदनशील गुन्हयात मयत सरपंच कै.संतोष देशमुख रा.मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते.
सुदर्शन घुले नेमका कोण? त्याची पार्श्वभूमी काय?
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले. पोलीस त्याच्या शोधात होते. मध्यंतरी त्याचा खून झाल्याच्याही अफवा होत्या. संतोष देशमुख यांचं अपहरण करणारा आणि टॉर्चर करुन त्यांचा खून करणारा मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. आरोपी संतोष घुले अद्याप फरार आहे. सुदर्शन घुलेची पार्श्वभूमी आपण पाहिली तर, त्याचं वय 27 वर्ष असून, तो बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचा आहे. त्याचं शिक्षण झालं जेमतेम सातवीपर्यंत. त्यानंतर सुदर्शनला छंद लागला भाईगिरीचा.
राजकीय नेते मंडळींच्या सोबत राहायचं. नेते आणि पंटर सांगतील ती कामं करायची, त्यातूनच पैसे मिळवायचे. नेत्यांच्या सांगण्यावरुन एखाद्याला धमकावणं तसंच मारहाण आणि चोरी करण्याचेही आरोप त्याच्यावर असल्याचं गावातील केजमधील लोक सांगतात. म्हणजे कायदेशीर भाषेत तो गुन्हेगारच होता. सुदर्शन घुलेला भाईगिरीचा नाद, त्याचं स्वप्नही तसंच होतं. एकुलता एक असलेला सुदर्शन घुलेचं कुटुंब म्हणजे घरी फक्त त्याची आई. सुदर्शनच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून, घरी 2 ते 4 चार एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती आम्हाला बीडमधील सुत्रांकडून मिळाली.
हे ही वाचा >> Beed : बीडमध्ये पुन्हा तशीच घटना, माजी सरपंचाला उचललं, डांबून ठेवलं, पायात कुलूप असलेल्या अवस्थेत...
सुदर्शन घुलेचं घर पाहिलं, तर पत्र्याचं घर. पण त्याच्याकडे गाडी होती. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ. ही स्कॉर्पिओ त्याच्याकडे कशी आली? कोणी दिली? याची माहिती आम्हाला मिळू शकली नाही. पण सुदर्शन हा केजमधील एका नेत्याच्या संपर्कात होता. याच नेत्याच्या सांगण्यावरुन तो कामं करायचा असं स्थानिक लोक सांगतात. हाच सुदर्शन घुले 6 डिसेंबरला मस्साजोग गावातील पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकांसोबत त्याचा वाद झाला होता. यावेळी संतोष देशमुख आणि मस्साजोगचे काही गावकरी मध्यस्थी करण्यासाठी आले असता सुदर्शन घुले आणि टोळीचा त्यांच्यासोबतही वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून आपला अपमान झाल्याचं घुले आणि त्याच्या साथीदारांना वाटत होतं. त्यानंतरच त्यांनी पुढचा सगळा प्रकार केला होता. त्याला आता अटक झाली असून, फक्त कृष्णा आंंधळे आता फरार आहे. लवकरच पोलीस त्यालाही शोधतील अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
