कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्राला आणि देशाला हादरा देणारी ठरली. या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झाली एवढंच नाही तर कोरोनामुळे अनेक मृत्यूही झाले. या सगळ्यात महत्त्वाच्या ठरल्या त्या दोन गोष्टी एक म्हणजे मास्क लावणं आणि दुसरं म्हणजे लस घेणं. लस घेण्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आता तात्या विंचू म्हणजेच झपाटलेला या सिनेमातला बाहुला जनजागृती करतो आहे. चला आपण सगळे मिळून कोरोनाचा ओम फट् स्वाहा करूया असं आवाहन तात्या विंचूने केलं आहे. एवढंच नाही तर तात्या विंचूने लसही घेतली आहे.
ADVERTISEMENT
सुप्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या लाडक्या बाहुल्यांपैकी एक असलेल्या तात्या विंचूचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत बाहुला तात्या विंचू लस घेताना आणि कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसतो आहे. व्हीडिओ सुरू झाला की लगेच तात्या विंचू मास्क लावलेल्या रूपात समोर येतो. त्याला लस देण्यात येते. मग तो म्हणतो नमस्कार मी तात्या विंचू मी कोरोनाची लस घेतली आहे. तुम्ही पण लस घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. आपण सगळे मिळून कोरोनाला ओम फट् स्वाहा करून टाकू. असं म्हणत हा बाहुला या व्हीडिओत कोरोनाविषयी जनजागृती करताना दिसतो आहे.
शब्दभ्रमकार तात्या विंचू यांनी पोस्ट केलेल्या या व्हीडिओला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रामदास पाध्ये यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. रामदास पाध्ये यांच्या शब्दभ्रम या कलेने आणि बोलक्या बाहुल्यांनी आपल्याला खूप खूप हसवलं आहे. झपाटलेला आणि झपाटलेला2 अशा दोन्ही सिनेमांमध्ये आपल्याला त्यांचा तात्या विंचू हा बाहुला दिसला होता. या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. महेश कोठारे यांचं दिग्दर्शन, तात्या विंचूला दिलीप प्रभावळकरांचा आवाज आणि रामदास पाध्ये यांनी त्या बाहुल्यासाठी घेतलेली मेहनत यामुळे हा सिनेमा हिट ठरला होता. आता हाच तात्या विंचू आपल्याला लस घेण्याचं आणि कोरोनाचा ओम फट् स्वाहा करण्याचं आवाहन करतो आहे.
रामदास पाध्ये यांच्या अर्धवटराव आणि आवडाबाई या दोन बाहुल्यांनीही आपल्याला गेली अनेक दशकं हसवलं आहे. त्यांच्या बाहुल्यांनी जनजागृतीचंही काम अनेकदा केलं आहे. आता पुन्हा एकदा तात्या विंचूचा व्हीडिओ पोस्ट करून रामदास पाध्ये यांनी कलाकार म्हणून आपलं सामाजिक भान जपलं आहे.
ADVERTISEMENT