महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. मुंबई, अमरावीत, अकोला, पुणे, नागपूर, सोलापूर अशा महत्वाच्या शहरांत नव्याने रुग्ण समोर येत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. अशातच दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मतिमंद निवासी विद्यालयातील ४६ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंत्रोळी येथील मतिमंद विद्यार्थ्यांसाठीची शाळा सुरु करण्यात आली होती. जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी या शाळेत दाखल झाले होते. या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्रास व्हायला लागला. यानंतर आरोग्य विभागातर्फे या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात २१ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आणखी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
निवासी विद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव हे तात्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अंत्रोळीला रवाना झाले आहेत. याव्यतिरीक्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेऊन ७ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT